दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नागपूरमध्ये ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या सुवर्ण जयंती कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. म्हणाले, तुमच्यासारख्या आम्हाला दंगली घडवता येत नाहीत मात्र, शाळा आणि हॉस्पिटल बांधता येतात.
अरविंद केजरीवाल म्हणाले, देशात एक असा पक्ष आहे की जो कुठे दंगल घडो, त्यातल्या गुंडांना आणि लफंग्यांना पक्षात सहभागी करून घेतो. जर तुम्हाला दंगली हव्या असतील तर खुशाल त्यांच्यासोबत जा, जर शाळा आणि हॉस्पिटल्स हवे असतील तर आमच्यासोबत या. आम्हाला शाळा आणि हॉस्पिटल्स बांधता येतात, दंगली घडवता येत नाहीत. असे म्हणत भाजपवर निशाणा साधला.
तसेच म्हणाले, मी देवाकडे दोन गोष्टी मागतो, एक म्हणजे भारत नेहमी जगातील पहिल्या क्रमांकाचा देश राहो. तर दुसरी बाब ही आहे की भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश होत नाही तोपर्यंत मला मृत्यू मिळू नये. मला राजकारण करायचं नाही तर मला फक्त काम करायचं आहे.
चोरी करणं, भ्रष्टाचार करणं, दंगली घडवणं, गुंडगिरी करणं हे सगळं आम्हाला जमत नाही. आम्हाला शाळा आणि हॉस्पिटल बांधता येतात. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकणं हे आमचं लक्ष्य नाही तर आमचं लक्ष्य हे देश आहे. आम्ही आमचं करिअर करण्यासाठी आलो नाही तर करिअर सोडून आलो आहोत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
तसेच म्हणाले, आम्ही राजकारणात येण्याचं कारण म्हणजे, भारतमाता आहे. भारतमातेसाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. सत्ता मिळवण्यासाठी नाही तर देश वाचवण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत, असे केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील शाळा यांची तुलना केली.
केजरीवाल म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांची अवस्था अतिशय वाईट आहे. पूर्वी दिल्लीतल्या शाळांमध्ये हीच परिस्थिती होती. मात्र आता दिल्लीत ही स्थिती बदलली आहे. सरकारी शाळांचा निकाल चांगला असून, चार लाख विद्यार्थी खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये आले आहेत. मात्र महाराष्ट्रात अशी स्थिती नाही, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.