मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई । अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली. संततधारेमुळे शहराच्या अनेक भागांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी साचले आहे.

यामुळे येथे वाहतुकीचा वेग मंदावला आहे, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेने संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी मुंबईत झालेल्या पावसाने ३८ ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले. त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांचा खोळंबा झाला. अंधेरी सबवे आणि किंग्ज सर्कल भागात तुलनेने जास्त पाणी होते.

आज देखील मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता असल्यामुळे यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. महत्वाच्या कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.