कोरोनामुळे तुटल्या जाती धर्माच्या भिंती; मुंबईत मुस्लिम कब्रस्तानात होतायत हिंदूंवर अंत्यसंस्कार

 

मुंबई। मुंबईतील कोरोनाची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. मुंबईत आतापर्यंत ४,६३१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईतील सर्व स्मशानभूमीमध्ये रोज प्रेतांचा खच पडत आहेत.

एका प्रेतावर अंत्यसंस्कारासाठी दीड ते दोन तासांचा अवधी लागत असल्याने स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून पालिकेकडून अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था केली आहे.

कोरोना झाल्यावर संबंधितांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी मरीनलाईन्स येथील बडा कब्रस्थान हे हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोकांसाठी दिलासा देणारे ठरले आहे.

या कब्रस्थानमध्ये एप्रिल महिन्यापासून मुस्लिमांच्या मृतदेहाचे दफन तर होत आहेच, मात्र येथे हिंदू बांधवांच्या कोरोनाच्या सुमारे २०० मृतदेहाचे अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आहेत. अशी माहिती कब्रस्थानचे सदस्य इकबाल ममदानी यांनी दिली आहे.

त्यामुळे या कब्रस्थानात कोरोनाने जाती धर्माच्या भिंतींना मूठमाती दिल्याचे दिसून येत आहे. जाती धर्माच्या भीती गेल्या काही वर्षांत बळकट झाल्या होत्या. त्यात हिंदू – मुस्लिम यांच्यातील द्वेषाचे राजकारण केले जात होते.

कोरोनाच्या महारोगाने जातीच्या या भिंती पुसल्या आहेत. बडा कब्रस्थानमध्ये तर जाती धर्माच्या भिंतीच उध्वस्त झाल्या आहेत. या कब्रस्थानात दिसते ती फक्त मानवता. या कब्रस्थानातील कमिटीच्या सदस्यांनी शहर आणि उपनगरासाठी तीन गट तयार केले आहेत.

ते गट अडचणीत असलेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांच्या मृतदेहांवर त्यांच्या धार्मिक रितिरिवाजानुसार आणि मृतदेहाचे पावित्र्य राखून अंत्यसंस्कार करतात. असे देखील ममदानी यांनी सांगितले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.