Sangli Crime: विवाहित तरुणीचा खून केला आणि मृतदेह नदीत फेकला; मित्राने असे का केले? सांगलीतील धक्कादायक घटना समोर

Sangli Crime: सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर (Islampur) परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून एका विवाहित तरुणीचा तिच्याच मित्राने गळा आवळून खून केला आणि नंतर मृतदेह कृष्णा नदीत (Krishna River) फेकून दिला. एवढंच नव्हे तर, या भयानक कृत्यानंतर आरोपी स्वतः ईश्वरपूर पोलीस ठाण्यात (Islampur Police Station) पोहोचून गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे सांगली (Sangli) परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळवा तालुक्यातील (Walwa Taluka) एका गावातील विवाहित महिला आपल्या पतीच्या अनुपस्थितीत स्वतः काम करून संसार सांभाळत होती. तिचा पती कर्नाटकात (Karnataka) मजुरी करत होता, तर ती खासगी रुग्णालय आणि खानावळीत काम करत होती. या दरम्यान ईश्वरपूर येथील रुग्णालयात काम करताना तिची ओळख एका तरुणाशी झाली. पीडितेच्या आईला तेथे दाखल केले असताना दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ती मैत्री हळूहळू अधिक घट्ट झाली.

या मैत्रीतूनच दोघांमध्ये पैशांची देणघेण सुरू झाली. काही महिन्यांपासून पैशांच्या व्यवहारावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अखेर या वादातूनच संशयित तरुणाने विवाहित मैत्रिणीचा गळा आवळून खून केला. यानंतर त्याने मृतदेह पोत्यात भरून ताकारी (Takari) परिसरातील कृष्णा नदीत फेकून दिला.

मंगळवारी सायंकाळी पीडित महिला घराबाहेर गेल्यानंतर ती परत आली नाही. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी बुधवारी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर काही तासांतच आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात आला आणि थेट गुन्ह्याची कबुली दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने ताकारी परिसरात शोधमोहीम सुरू केली. नदीच्या पात्रात शोध घेताना संशयिताची दुचाकी सापडली, मात्र महिलेचा मृतदेह सापडलेला नव्हता. पोलिसांनी घटनास्थळी तळ ठोकून शोधकार्य सुरूच ठेवले असून पुढील तपास सुरु आहे.

या घटनेमुळे वाळवा तालुका आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विवाहित महिलेचा खून आणि त्यानंतर आरोपीचे स्वतः पोलिसांकडे आत्मसमर्पण करणं, या दोन्ही गोष्टींनी नागरिकांना हादरवून सोडलं आहे.