रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२३ ची दुसरी मालिका जिंकली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत विजयाचा झेंडा फडकवल्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका जिंकली.
वनडे मालिकेतील शेवटचा सामना १५ जानेवारी रोजी खेळला गेला, ज्यामध्ये भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला. त्याचवेळी हा सामना आणि मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा खूपच खूश होता. पण त्याने या मालिकेतील विजयाचे श्रेय ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ ठरलेल्या विराट कोहलीला नव्हे तर एका गोलंदाजाला दिले आहे.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील कामगिरी अप्रतिम होती. त्यामुळे मालिका संपल्यानंतर त्याला प्लेअर ऑफ द सीरीजचा किताब देण्यात आला. मात्र मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मुलाखत देताना किंग कोहलीचा उल्लेख केला नाही. त्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आपल्या विजयाचा हिरो मानला.
तो म्हणाला की, आमच्यासाठी ही एक उत्तम मालिका होती. या मालिकेतून चांगल्या गोष्टी समोर आल्या आहेत. आम्ही चांगली गोलंदाजी केली आणि फलंदाजीही उत्कृष्ट होती. मोहम्मद सिराजने या मालिकेत खूप चांगली कामगिरी केली आहे.
पुढे रोहित म्हणाला की, तो एक खूप चांगला खेळाडू आहे. तो गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे खेळला आहे ते खरंच आश्चर्याचा धक्का देणारे आहे. शेवटच्या सामन्यात त्याने ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे संघाला सामना जिंकणे सहज सोपे झाले. त्याच्याकडे काही युक्त्या आहेत ज्यावर तो काम करत आहे.
रोहित शर्माने सांगितले की, आमचे पुढील लक्ष्य न्यूझीलंड मालिका जिंकण्याचे असेल. आधी आम्ही खेळपट्टी कशी आहे ते पाहू, मग कॉम्बिनेशन काय असेल ते ठरवू. ते पाकिस्तानमध्ये मालिका जिंकून येत आहेत, त्यामुळे हे काम सोपे असणार नाही.
विशेष म्हणजे न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत अक्षर पटेल आणि केएल राहुल खेळताना दिसून येणार नाही.
न्यूझीलंड विरुद्ध वनडेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहं. शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक
न्यूझीलंडविरुद्ध टी-२० साठी भारतीय संघ: हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार
महत्वाच्या बातम्या-
दोन मुलींनंतर मुलगा झाल्याने नवस फेडायला पशुपतीनाथला गेला पण विमान अपघातात काळाने घातला घाव
Aurangabad : कौतुकास्पद! सुनेच्या मदतीसाठी धावून आली सासू, स्वत:ची किडनी देत वाचवले प्राण
त्या व्यक्तीने पार्सलवर असा पत्ता लिहिला की डिलिव्हरी करणारी व्यक्ती मरेपर्यंत विसरणार नाही!