Vijay Ghadge Met Ajit Pawar Pune : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे (Vijay Ghadge) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्यात भेट घेतली. ही भेट सुरज चव्हाण (Suraj Chavan) या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या कार्यकर्त्याने विजय घाडगे यांच्यावर कथितपणे केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती. या भेटीनंतर विजय घाडगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाचे खुलासे केले.
घाडगे म्हणाले की, “दादांनी जे घडलं ते चुकीचं आहे, असं स्पष्ट सांगितलं. राज्याच्या राजकारणात अशा घटना घडू नयेत. आरोपींवर केवळ किरकोळ गुन्हे दाखल करून काहींना सोडून देण्यात आले आहे. यावर अजित पवार यांनी स्वतः लातूर (Latur) पोलिसांशी संपर्क केला आहे.”
विजय घाडगे यांनी अजित पवार यांच्याकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा राजीनामा घेण्याची स्पष्ट मागणी केली आहे. यावर अजित पवार यांनी दोन दिवसांची वेळ मागितली असून, घाडगे यांनी मंगळवारपर्यंतची मुदत देत आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
घाडगे म्हणाले, “मी लातूरला जाऊन पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे. जर दोन दिवसांत कोकाटेंचा राजीनामा झाला नाही, तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार आहोत. गरज पडल्यास आम्ही अजित पवार यांच्या निवासस्थानासमोरही आंदोलन करु.”
तसेच, घाडगे यांनी सांगितले की, त्यांनी अजित पवार यांना थेट विचारले की, “तुमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला का मारलं?” यावर अजित पवार म्हणाले की, “तो (सूरज चव्हाण) पुन्हा पक्षात येणार नाही.”
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांचा आजचा जळगाव (Jalgaon) दौरा अचानक रद्द करण्यात आला. त्यांना चोपडा येथे आयोजित ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे होते, परंतु कोणतेही कारण न देता ते नंदुरबार (Nandurbar) कडे रवाना झाल्याचे आयोजक सुनील पाटील (Sunil Patil) यांनी सांगितले.