Share

Valmik Karad : टपरीवर चहा पिणाऱ्याने केला वाल्मिक कराडच्या गँगचा ‘खेळ खल्लास’, सरपंच देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

Valmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाचा संबंध सुग्रीव कराडशी जोडला जात असून, सुदर्शन घुले याने वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून सूड उगवण्यासाठी हा कट रचल्याचे जयराम चाटे याने कबूल केले आहे. दरम्यान, या हत्येच्या चौकशीत आवादा एनर्जी कंपनीबाहेर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्त्वाचा ठरत आहे.

खंडणीच्या वादातून हत्येचा कट?

६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२:३० वाजता सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार आवादा एनर्जी कंपनीच्या गेटवर पोहोचले. त्यांनी गेटवरील सुरक्षारक्षकाला शिवीगाळ केली, त्याचवेळी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे तिथे आले. यावेळी सुदर्शन घुलेने थोपटे यांना धमकावत, “वाल्मीक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपयांची खंडणी अण्णाला द्या,” असे सांगितल्याचा जबाब एका प्रत्यक्षदर्शीने दिला आहे.

सरपंच देशमुखांना धमकी

त्याचवेळी सरपंच संतोष देशमुख घटनास्थळी पोहोचले आणि घुले व त्याच्या साथीदारांना समजावू लागले. त्यांनी कंपनी बंद करू नये, यामुळे गावकऱ्यांना रोजगार मिळत असल्याचे सांगितले. मात्र, सुदर्शन घुलेने त्यांना थेट धमकी देत, “तुला बघून घेईन, तुला जिवंत सोडणार नाही,” असे म्हटल्याचा प्रत्यक्षदर्शीचा जबाब आहे.

अपहरणाचा थरार

सरपंच देशमुख यांच्या अपहरणप्रकरणी नवे तपशील समोर आले आहेत. उमरी टोल नाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली. सुधीर सांगळे याने ड्रायव्हरच्या बाजूच्या काचेला दगड मारला आणि गाडी थांबवली. त्यानंतर सुदर्शन घुलेने गाडीचा डावा दरवाजा उघडत सरपंचांना बाहेर खेचले. जयराम चाटे याने त्याच्या हातातील कोयत्याने चालक शिवराज देशमुख याला धमकावले.

यानंतर संतोष देशमुख यांना जबरदस्तीने मारहाण करत स्कॉर्पिओ गाडीत बसवण्यात आले आणि अपहरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ही स्कॉर्पिओ गाडी स्वतः सुदर्शन घुले चालवत होता, अशी कबुली त्याने दिली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींविरोधात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now