Ambadas Danve on Walmik Karad : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा करत सांगितले की, वाल्मिक कराड (Valmik Karad) हे तुरुंगात असूनही बाहेरील व्यवहारांमध्ये सक्रीय आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दानवे म्हणाले, “मी स्वतः एका व्यक्तीसमवेत होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या मोबाईलवर जेलमधून थेट वाल्मिक कराड यांचा कॉल आला होता.”
तीन महिन्यांपूर्वीच दिला होता इशारा
दानवे म्हणाले, “मी तीन महिन्यांपूर्वीच हा मुद्दा उपस्थित केला होता. जेलमध्ये असलेल्या व्यक्तीकडून असे कॉल्स होत असतील, तर ते गंभीर प्रकरण आहे. याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कृषी विभागात (Agriculture Department) नैतिक पातळीवर घोटाळा झाला असून, केवळ कायदेशीर क्लीन चिट म्हणजे सर्वकाही स्पष्ट असे होत नाही.
शिरसाट – मिसाळ वादावरही दानवेंची स्पष्ट भूमिका
सामाजिक न्याय विभागात (Social Justice Department) निर्माण झालेल्या अंतर्गत मतभेदांवरही अंबादास दानवे यांनी भाष्य केलं. कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्यात विभागीय बैठक घेण्यावरून टोकाची नाराजी आणि पत्रव्यवहार झाला. यावर दानवे म्हणाले, “कामाच्या अनुषंगाने राज्यमंत्री देखील बैठक घेऊ शकतात. निर्णय प्रक्रियेचे नियम ठरलेले असले तरी लोकशाहीत सामंजस्य हवे असते. दोघांनीही पत्र लिहिण्याऐवजी थेट संवाद साधायला हवा होता.”
“सिस्टीमला मान्य करा” – दानवे यांचा सल्ला
दानवे पुढे म्हणाले की, “ही लोकशाही आहे. येथे सिस्टीमप्रमाणे काम होतं. अधिकारांच्या वादात न अडकता नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. दोघांनी एकमेकांशी संवाद साधून वाद मिटवायला हवा होता, पत्रांचा वापर हे योग्य माध्यम नव्हे.”