Vaishnavi Hagavane : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात तीव्र खळबळ उडवून दिली आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या सासरच्या पाच सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, सासू, नणंद आणि पतीला गजाआड करण्यात आले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातही मोठी हालचाल दिसून आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली असून, यासंदर्भात अधिकृत नोटीसही काढण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे हे मुळशी तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, तर सुशील हगवणे युवक काँग्रेसचा पदाधिकारी होता.
सुशील हगवणेची जुनी पोस्ट पुन्हा चर्चेत
दरम्यान, सुशील हगवणे याने 3 मे 2024 रोजी इन्स्टाग्रामवर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. ही पोस्ट त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी केली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सुनेत्रा पवार या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रिंगणात होत्या.
सुशीलने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते: “यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणुया… सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया… एक मत सुनेसाठी!”
नेटकऱ्यांचा संतप्त प्रतिसाद
ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली असून, अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत सुशील हगवणे आणि त्याच्या कुटुंबावर सडकून टीका केली आहे. वैष्णवी हगवणे आणि दुसऱ्या सुनांना घरात छळ केल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी पोस्टवर रोष व्यक्त केला आहे. अनेकांनी “लोका सांगे ब्रह्मज्ञान, आणि स्वतः कोरडे पाषाण” अशी प्रतिक्रिया दिली आहे. “निर्लज्ज राजकारणी!”,”सुनेबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही!”, “तुमच्या घरातल्या सुनांना इज्जत द्यायला जमलं नाही, आणि इथे सुनेचा गौरव करताय?”, “तुम्ही आणि तुमचं कुटुंब फक्त बाह्याडंबर करणारे!”, “स्वतःचं घर सांभाळता येत नाही आणि इथे मोठ्या नेत्यांसोबत फोटो पोस्ट करताय?”
पक्षनेत्यांवरही निशाणा
या पोस्टमध्ये सुशील हगवणेने सुनेत्रा पवार आणि रूपाली ठोंबरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. त्यामुळे या नेत्यांनाही सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात आहेत. काहींनी विचारले आहे की, “काल चॅनेलवर म्हणालात की हे लोक पक्षात आहेत हे माहिती नव्हतं, मग हे काय आहे?” अशा प्रकारे राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरही दबाव वाढताना दिसतो आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरण हे फक्त कौटुंबिक अत्याचाराचे प्रकरण न राहता, एक सामाजिक आणि राजकीय वादळ ठरत आहे. राजकारणात महिलांना सन्मानाची वागणूक देण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांच्या घरातच जर महिलांवर अन्याय होत असेल, तर जनतेचा संताप स्वाभाविक आहे. सुशील हगवणेची एक जुनी पोस्ट आज त्याच्यावर आणि पक्षावर उलटलेली आहे, आणि यामधून “कर्म आणि शब्द” यातला फरक पुन्हा अधोरेखित झाला आहे.
vaishnavi-hagavanes-sisters-that-post-is-in-the-news-people-are-outraged






