Vaishnavi Hagavane : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे मुळशी तालुक्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या धाकट्या सून वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या मृत्यूला अपघाती अथवा आत्महत्या मानण्याऐवजी तिच्या वडिलांनी थेट खुनाचा आरोप केला आहे, आणि या प्रकरणाला आता राजकीय व सामाजिक वळणही लागले आहे.
छळाची हकीगत – सोनं, कार असूनही पैसे कमीच पडले!
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, लग्नात ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर कार, सात किलो तांब्याची भांडी, त्यानंतर सोन्याची अंगठी, दीड लाखांचा मोबाइल अशा अनेक गोष्टी दिल्यानंतरही हगवणे कुटुंबाचं समाधान झालं नाही. उलट त्यांनी जमीन घेण्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांची मागणी केली. या मागणीला कस्पटे कुटुंबानं स्पष्ट नकार दिल्यानंतर वैष्णवीवरचा छळ अधिकच वाढला.
मृत्यूच्या आधीचा दिवस आणि संशय
१६ मे रोजी सकाळी शशांक हगवणेनं वैष्णवीच्या वडिलांना फोन करून, “तुमच्या पोरीला घेऊन जा,” असं सुनावलं. यानंतर काही वेळातच सासरी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी साडे चारच्या सुमारास पुन्हा शशांकचा फोन आला आणि त्याने वैष्णवीने आत्महत्या केल्याचं सांगितलं.
वैष्णवीला तातडीने बावधन येथील चेलाराम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिचा मृत्यू तेव्हाच झाला होता. जेव्हा वैष्णवीच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह पाहिला, तेव्हा तिच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या – हात, पाय, पाठीवर, मांडीवर, अंगावर अनेक ठिकाणी झालेल्या जखमा स्पष्ट दिसत होत्या.
पोस्टमॉर्टेम अहवाल आणि धक्कादायक कबुली
शवविच्छेदन अहवालातही वैष्णवीच्या अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूमागे शारीरिक छळ आणि हिंसाचार असल्याचा स्पष्ट संशय व्यक्त करण्यात येतो आहे. वैष्णवीचे वडील सांगतात, “मी जावई शशांक आणि सासरे राजेंद्र हगवणे यांना विचारले की अंगावर एवढ्या जखमा कशा? त्यावर त्यांनी धक्कादायक उत्तर दिलं – ‘तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आम्हाला पैसे पाहिजेत. तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं? म्हणून तिला मारून टाकलं.’”
गुन्हा दाखल, अटक व फरार आरोपी
या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू आणि नणंदला अटक केली आहे. मात्र सासरे राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
प्रश्नांची मालिका सुरूच…
जर आत्महत्या होती, तर तिच्या शरीरावर इतक्या गंभीर जखमा का?
मृत्यूपूर्वी वैष्णवीला घरातून काढून टाकण्याची धमकी का देण्यात आली?
एवढ्या मोठ्या आर्थिक देणग्यांनंतरही वैष्णवीचा छळ का थांबला नाही?
आरोपींना कथित व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली जात आहे?
या सर्व प्रश्नांमुळे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने केवळ मुळशी किंवा पुणे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आता हा केवळ कुटुंबीयांचा लढा न राहता सामाजिक आणि राजकीय लढाही बनू लागला आहे.
vaishnavi-hagavanes-death-causes-uproar-across-the-state