Vaishnavi Hagavane death case Pune : पिंपरी चिंचवड परिसरात घडलेल्या वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagavane) आत्महत्येच्या प्रकरणात मोठी न्यायालयीन हालचाल झाली आहे. 16 मे 2025 रोजी गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर तब्बल 59 दिवसांनी बावधन पोलिसांनी (Bavdhan Police)पुणे सत्र न्यायालयात (Pune Sessions Court) 1676 पानी दोषारोपपत्र दाखल केलं आहे.
पोलिस तपासानुसार, वैष्णवीवर तिच्या पती शशांक हगवणे (Shashank Hagavane), सासू लता हगवणे (Lata Hagavane), सासरे राजेंद्र हगवणे (Rajendra Hagavane), नणंद करिष्मा (Karishma) आणि दिर सुशील (Sushil) यांनी हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला. या छळामुळे वैष्णवीने आत्महत्येस प्रवृत्त होऊन आपला जीव गमावला, असं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे.
दहा महिन्यांच्या बाळाची देखील झाली हेळसांड
या प्रकरणात निलेश चव्हाण (Nilesh Chavan) या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर वैष्णवीच्या दहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या दुर्लक्षिततेसाठी जबाबदार असल्याचा आरोप आहे. एकूण अकरा आरोपींच्या विरोधात हे दोषारोपपत्र दाखल झालं असून, यामध्ये राजेंद्र आणि सुशील यांना लपवण्यासाठी मदत करणाऱ्या पाच आरोपींचाही समावेश आहे. त्यांना अटकेनंतर जामीन मिळाला असून, उर्वरित सहा आरोपी सध्या येरवडा कारागृहात (Yerwada Jail) आहेत.
16 मे रोजी वैष्णवीने घरातील बेडरूममध्ये दरवाजा बंद करून गळफास घेतल्याची माहिती समोर आली होती. काही वेळानंतर शशांकने दरवाजा वाजवला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. वैष्णवीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) करण्यात आले.
वडिलांची तक्रार ठरली महत्त्वाची
वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे (Anand Kasapte) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत तिच्या पतीसह संपूर्ण सासरच्यांवर गंभीर आरोप केले. मानसिक व शारीरिक छळ, मारहाण आणि अत्याचारांमुळेच वैष्णवी आत्महत्येस प्रवृत्त झाली, असा आरोप त्यांनी केला होता.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अटकसत्र राबवत सर्व आरोपींना ताब्यात घेतलं. दोषारोपपत्र दाखल होताच प्रकरणाला वेग आला असून, न्यायालयीन लढाई आता अधिक ठोस स्वरूप घेण्याची शक्यता आहे.