Share

Nashik Crime : ‘माझ्या बायकोला तुझ्या शेतात कामाला का नेतो?’, जाब विचारत पतीने मालकाची कार फोडली; पुढे जे झालं ते थरकाप उडवणारं

Nashik Crime : नाशिकच्या उंटवाडी टाकेद खुर्द (Untwadi Takede Khurd) परिसरात वैयक्तिक वादातून जीवघेणे वळण घेतलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरी निवृत्ती नाडेकर (Pandhari Nadekar) यांनी “माझ्या बायकोला तुझ्याकडे मजुरीला का नेतोस?” असा जाब विचारत शेतमालकाच्या गाडीवर कुऱ्हाडीने वार केले. यामुळे भडकलेल्या शिवराम चिंधू गंभीरे (Shivram Gambhire) यांनी रागाच्या भरात तीच कुऱ्हाड हिसकावून समोरच उभ्या असलेल्या व्यक्तीवर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात पंढरीचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द (Igatpuri Takede Khurd) येथे संध्याकाळी घडली. मारहाणीची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संशयिताला ताब्यात घेतलं. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास वरिष्ठांकडे सोपवण्यात आला आहे.

पत्नीला कामाला का नेलं? 

शेतीमजुरीच्या वादातून सुरुवात झालेल्या या प्रकरणात पंढरी नाडेकर यांनी संशयिताच्या चारचाकी वाहनावर कुऱ्हाडीने वार केले. गाडीची काच फुटल्यानंतर संतापलेल्या शेतमालकाने त्याच्या हातातील कुऱ्हाड हिसकावली. दोघांमध्ये झटापट झाली आणि क्षणभरात परिस्थिती गंभीर बनली. पंढरीवर झालेल्या जोरदार हल्ल्यांनी तो कोसळला. त्याच्या नातेवाईकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर संशयितावर खूनाचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात आणखी एका ठिकाणी नायलॉन मांजामुळे भीषण अपघात घडला. मुसळगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी विकी पोपट जाधव आणि जयेश खामकर सकाळी दुचाकीवरून जात असताना त्यांच्या गळ्याला मांजा अडकला. धावत्या गाडीवर नियंत्रण सुटताच दोघांचा तोल गेला.

या अपघातात विकी जाधव यांच्या डोळ्याजवळ खोल जखम झाली आणि तत्काळ बारा टाके घालावे लागले. मागे बसलेल्या जयेश खामकर यांचा डावा हात कापला गेला. रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांना तातडीने सिन्नर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारानंतर दोघांना घरी सोडण्यात आले असले तरी परिसरात नायलॉन मांजाबाबत संताप वाढला आहे.

याच आठवड्यात सिन्नर शहरातही एका तरुणाला याच मांजामुळे गंभीर दुखापत झाली होती. सात दिवसांत तीन अपघात घडल्याने नागरिकांनी नायलॉन मांजावर कठोर बंदी व कडक कारवाईची मागणी केली आहे.

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now