मोठी बातमी! विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड

मुंबई । राज्यात आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आणि या निवडणुकीत सातव बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामुळे काँग्रेसने या निवडणुकीत बाजी मारली आहे.

या निवडणुकीत काँग्रेसने दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवार म्हणून घोषित केल्याने या निवडणुकीकडे लक्ष लागून होते. भाजपाचे उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सातव बिनविरोध निवडून आल्या आहेत. यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले.

काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातव यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची खंबीर साथ आणि विरोधी पक्ष भाजपाने आपला उमेदवार मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केली, त्याबद्दल त्यांचे आभार, असे ट्विट त्यांनी केले आहे.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही दिवसांपूवी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यांना याबाबत विनंती केली होती. यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध झाली आहे.

काँग्रेसी नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केलेल्या विनंतीनंतर भाजपाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रज्ञा सातव यांना प्रमाणपत्र देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाना पटोले, आमदार भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

या मान्यवरांनी विजयी उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. यानंतर नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेऊन चर्चा केली आहे. यावेळी अनेक नेते देखील उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.