Russia : रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात रशियाला एक महत्त्वाचं यश मिळालं आहे. डोनेट्स्क (Donetsk) प्रांतातील शेवचेन्को (Shevchenko) नावाच्या गावाच्या आजूबाजूचा भाग रशियन सैन्याने ताब्यात घेतला आहे. हे गाव खूप महत्त्वाचं मानलं जातं कारण तिथं मोठ्या प्रमाणात लिथियम (Lithium) असल्याचं शास्त्रज्ञांनी 1982 मध्ये स्पष्ट केलं होतं. या गावात सुमारे 13.8 दशलक्ष टन लिथियम साठा असल्याचं सांगितलं जातं, ज्यामुळे रशियाची लष्करी आणि तांत्रिक ताकद मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
लिथियमला ‘पांढरं सोनं’ (White Gold) असं म्हटलं जातं आणि हे आधुनिक सैनिकी उपकरणे, ड्रोन, पोर्टेबल कम्युनिकेशन सिस्टीम आणि सेन्सर्स तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे, या भागावर रशियाचा कब्जा मिळणं हे जागतिक शक्ती संतुलनासाठी निर्णायक ठरू शकतं. विशेषतः अमेरिकेसाठी (USA) आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासाठी ही मोठी धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्याशी लिथियम उत्खननासाठी करार केला होता, पण रशियाच्या हस्तक्षेपामुळे तो करार धोक्यात आला आहे.
शास्त्रज्ञांनी 1982 साली याठिकाणी 13.8 दशलक्ष टन लिथियमचा साठा असल्याचं नमूद केलं होतं. या साठ्यामुळे रशियाला भविष्यात ड्रोन, सेन्सर आणि आधुनिक बॅटऱ्यांमध्ये स्वयंपूर्ण होण्याची संधी मिळणार आहे.
चीनचा दबदबा वाढणार
या सगळ्या घडामोडींमुळे चीनचा (China) जागतिक खनिज बाजारातील प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीन सध्या जागतिक लिथियम उत्पादनात आघाडीवर आहे आणि सुमारे 60% शुद्धीकरण क्षमता त्यांच्याकडे आहे. रशियासोबत संरक्षण व तांत्रिक सहकार्य असलेल्या चीनला शेवचेन्कोमधील उत्खननात मदत करण्याची संधी मिळेल.
भूगर्भीय अडचणींमुळे रशियासमोर अजूनही अनेक अडथळे आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे त्यांना खाणींमधून खनिज काढण्यात अडचणी येऊ शकतात. पण चीनच्या मदतीने ही अडचण दूर होण्याची शक्यता आहे, कारण चीनने आधी म्यानमार (Myanmar) सारख्या देशांमध्ये धातूंचं उत्खनन केलं आहे.
अमेरिकेच्या योजनांना झटका
अमेरिका आणि युक्रेनमध्ये झालेल्या खनिज कराराला मोठा झटका बसला आहे. युक्रेनचं सैन्य आधुनिकीकरण करण्याच्या योजना यामुळे अडथळ्यात येऊ शकतात. रशियाच्या या पावलामुळे केवळ युक्रेन नाही, तर अमेरिका आणि पश्चिमी देशांचं सामरिक नियोजनही डगमगेल.