आरक्षणामुळे सगळा देश, समाज जातीजातीत वाटला जातोय – उदयनराजेंनी व्यक्त केली खंत

मुंबई | ‘मराठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे,’ असे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. तसेच आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. तीच शिकवण आजही अंमलात आणणं अपेक्षित आहे. मात्र, आज या आरक्षणामुळे आपण चांगले मित्र गमावत चाललोय. एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चाललोय, याचं फार वाईट वाटतंय, अशी खंत खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केली.

आपण मराठा आरक्षणासाठी अनेकदा मागणी केली असून विनंतीही केली असल्याचे ते म्हणाले आहेत. इच्छा असेल तर साष्टांग नमस्कार घालण्याचीही माझी तयारी आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले. जसं इतर जाती-जमातींसाठी करता त्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठीही प्रयत्न करा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.

दरम्यान, ‘आजवर अनेक जाती, समाजाला आरक्षण दिले, कुणाला नव्याने हवे आहे. पण या आरक्षणामुळे सगळा देश, समाज जातीजातीत वाटला जात आहे. समाजात कटुता निर्माण झाली आहे, एक राष्ट्र म्हणून हे खूप वाईट,’ असल्याची भावना उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

 

महत्त्वाच्या बातम्या
बीसीजीची लस कोरोनावर ठरतेय चांगलीच परिणामकारक; मुंबईच्या संशोधकांची माहिती
‘या’ वेबसाईटवर १ रुपयाची नोट लाखोंच्या किंमतीने विकली जाते, जाणून घ्या कशी विकायची?
पुनम पांडेने धरणावर विवस्र व्हिडीओ शुट केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.