Udhayanidhi Stalin : उत्तर भारतात हिंदीचा आग्रह वाढू लागल्याची चर्चा असताना, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या हिंदीसक्तीविरोधातील आवाजाला आता दक्षिणेकडूनही ठाम पाठिंबा मिळाल्याचं चित्र आहे. चेन्नईतील एका परिषदेत बोलताना तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी केंद्र सरकार हिंदी जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न करणार असेल तर तमिळनाडू भाषा लढाईसाठी पूर्णपणे तयार असल्याचा इशारा दिला.
त्यांनी स्पष्ट केलं की, राज्यांच्या अधिकारांवर केंद्राचा दबाव वाढत चालला आहे आणि भाषा थोपवण्याचा प्रयत्न झाला, तर दक्षिणेकडील राज्यं शांत बसणार नाहीत. “आमची भाषा, आमचे हक्क आणि आमच्या जनतेच्या मतदानाचा अधिकार हे सगळं वाचवण्यासाठी तमिळनाडू शेवटपर्यंत ठाम उभं राहील,” असा ठाम संदेश त्यांनी द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या भूमिकेतून दिला.
उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्रातील सरकारवर कठोर टीका करताना सांगितलं की, संघराज्य व्यवस्थेला कमजोर करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्यांकडे निधी उशिरा पाठवणे, कर-वाटपात न्याय न देणे आणि केंद्र सरकारच्या योजना राज्यांवर लादणे. यामुळे दक्षिणेकडील राज्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
विशेषतः प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचनेमुळे (delimitation) दक्षिणेतील राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त करताना, “राजकीयदृष्ट्या ज्यांची ताकद आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या अशक्त करण्याचा डाव” असा थेट आरोप त्यांनी केला.
दरम्यान, महाराष्ट्रातही त्रिभाषा सूत्र आणि हिंदीसक्तीविरोधात जनआंदोलन उभं राहत असल्याचं ते म्हणाले. राजकीय नेते, सांस्कृतिक संघटना आणि विविध गटांनी उत्तर भारतातून वाढत्या हिंदीदबावाविरोधात कडक भूमिका घेतल्यामुळे या आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप मिळालं आहे.
चेन्नईतील ITC Grand Chola येथे आयोजित कार्यक्रममध्ये दक्षिण भारताचा राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रभाव राष्ट्रीय पातळीवर कसा वाढतोय, यावर सखोल चर्चा झाली. उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह तमिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री अंबिल महेश पोय्यमोझी, भाजपचे माजी अध्यक्ष के. अन्नामलाई, PMK नेता अंबुमणी रामदोस आणि अभिनेत्री मालविका मोहनन यांनीही सहभाग नोंदवला. परिषदेत सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेरणादायी सादरीकरणे आणि थेट प्रसारणाची सुविधाही देण्यात आली.