निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नाव दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच निकालानंतर ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले असून ते शिंदे गटावर टीका करताना दिसून येत आहे.
आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगावरुन आमचा विश्वास उडाला असून सर्वोच्च न्यायालयच आमची शेवटची आशा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
मातृभाषा, आई फक्त भाषा शिकवत नाही. संस्कारही शिकवतात. बाकी काही चोरलं जाऊ शकतं. पण संस्कार चोरले जाऊ शकत नाही. ज्यांच्यावर संस्कार होत नाही, ते चोऱ्या करतात. अमिताभ बच्चनच्या एका चित्रपटात हातावर लिहिलं होतं. यांनी स्वत:च्या हातानंच कोरलं आहे. पण कितीही केलं तरी ठाकरे नाव कसं चोरणार? स्वत:च्या बापाचं नाव वगळून त्यांना दुसऱ्यांचा बाप हवाय मग मी काय करु? त्यांच्या वडिलांना वेदना होत नसतील का? असे म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
शिवसेनेची स्थापना ज्या हेतूने झाली त्याचा मला अभिमान आहे. मराठी माणसाची अवेहलना केली जात होती. आपल्या राज्यात मराठी माणूस हातबल झाला होता. त्यांना शिवसेना नावाची तलवार बाळासाहेबांनी दिली. न्याय हक्क काय आणि तो कसा मिळवायचा हे पिढीला माहितीये. कोणासमोर गुडघे टेकणं हे बाळासाहेबांचे विचार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
तसेच ज्या घरामध्ये शिवसेनेची स्थापन झाली त्या घरामध्ये मी होतो. नाव ठरण्यापासून आतापर्यंतचा सर्व काळ मी बघितला आहे. आणीबाणी सुद्धा पाहिली आहे. शिवसेनेनं पाठिंबा दिला होता, पण त्यानंतर जे घडलं त्याला पाठिंबा दिला नव्हता. मार्मिकवर सुद्धा बंदी घातलेली होती, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
शिंदे गटावर टीका करतान उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या ज्या वेळी ते धनुष्यबाण धरतील, तेव्हा त्यांच्या कपाळावर चोर हे कोरलं जाईल. हिंमत असेल तर धनुष्यबाण घेऊन उतरा मी मशाल घेऊन उतरतो. धगधगते विचार आहे शिवसेना. फक्त चिन्ह म्हणजे शिवसेना नाही. मॉगेंबोच्या पिढ्या जरी उतरल्या तरी शिवसेना तशीच राहणार.
निवडणूक आयोग बोगसच आहे. आमचा विश्वास त्यांच्यावरुन उडाला आहे. २०२४ ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असू शकते. त्यामुळे आता फक्त एकच आशा आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात फरक आहे, त्यामुळे तीच शेवटची आशा आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोण मारणार बाजी? एक्झिट पोलमधून धाकधूक वाढवणारी आकडेवारी आली समोर
पुण्याच्या गोल्डमॅनचा दीड कोटींचा सोन्याचा शर्ट लंपास: धक्कादायक माहिती आली समोर
कोर्टातील लढाई सुरू असतानाच इंदुरीकर महाराजांनी ठाकरे आणि शिंदेंना केले खास आवाहन, म्हणाले…