Share

Uddhav Thackeray : राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं, इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीस सरकारने मारली, कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर ‘प्रहार’

Uddhav Thackeray : पूरग्रस्त आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) भव्य हंबरडा मोर्चा काढला. “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या” या मागणीसाठी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली.

“इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीस सरकारने मारली”

सभा संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी पंधरा दिवसांपूर्वी मराठवाड्यात आलो होतो, तेव्हा शेतकऱ्यांशी भेटलो आणि ठरवलं होतं. जोपर्यंत हे सरकार कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. मागच्या वेळेला आलो तेव्हा पाऊस होता, आता कडक ऊन आहे. पण संकटाच्या काळात शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे.”

ठाकरेंनी पुढे सांगितलं, “शेतकऱ्यांसाठी आम्ही हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मागितली आहे. ही मागणी आम्ही हवेतून केलेली नाही, तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून केली आहे. पण सरकारचं घोषित केलेलं पॅकेज म्हणजे एक मोठी थाप आहे. स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत. इतिहासातली ही सर्वात मोठी थाप देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मारली आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं”

उद्धव ठाकरे म्हणाले, “कैलास म्हणाले राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. पण आता एक शेतकरी म्हणाला, ‘साहेब, भोपळा नाही, टरबूज दिलं!’ म्हणजे ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. सरकार सांगतंय की, मनरेगातून साडेतीन लाख रुपये हेक्टरी देणार आहोत. मग मी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगतो. जर तुमची नियत खरी असेल, तर दिवाळीपूर्वी तीन लाखातील एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. मग विश्वास बसेल,” असं आव्हान ठाकरेंनी दिलं.

“कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “तुम्हाला राजकारणासाठी शेतकऱ्यांची मतं हवीत, पण त्यांचा न्याय मागितला की तुम्ही म्हणता, ‘हे राजकारण आहे.’ आम्हाला पुनर्गठन नको. आम्हाला पूर्ण कर्जमुक्ती पाहिजे आहे. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं, म्हणून मला अधिकार आहे असं सांगतो.”

“सरकारने जर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली नाही, तर आम्ही फक्त मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी रस्त्यावर उतरवून तुमच्या विरोधात आंदोलन करू. आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,” असा ठाम इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

“५० खोके घेतलेले लोक शेतकऱ्यांना उत्तर देणार का?”

यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टोला लगावत म्हणाले, “पन्नास हजार रुपयांची मदत आम्ही कोणाकडे मागतोय तर ज्यांनी ५० खोके घेतले आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे ते सहजासहजी वठणीवर येणार नाहीत. शेतकऱ्यांनी आता चाबूक हातात घ्यावा लागेल,” असं वक्तव्य करून त्यांनी जमावात उत्साह निर्माण केला.

 “पंतप्रधानांना शेतकऱ्यांचं दुःख माहीत नाही”

“काल, परवा पंतप्रधान मुंबईत आले. पण त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांचा एकही उल्लेख नव्हता. देशाचे पंतप्रधान जर शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करत असतील, तर त्यांच्याकडे आपण काय न्याय मागणार?” असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now