Share

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा सौदा आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा स्फोट; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

Uddhav Thackeray: राज्यात निवडणुकांचं वादळ जोर धरत असतानाच पैशाच्या उधळणीचा उघडपणे खेळ सुरू असल्याचा तीव्र आरोप शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. “मतांच्या हक्कावर पैशाचा धूर कसा उठतोय? हे मतदान आहे की बाजारात चाललेला लिलाव?” असा तडक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, सत्तेचा दर्प इतका वाढलाय की लोकांच्या अडचणी, शेतकऱ्यांची वेदना किंवा शहरातील जनतेचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही. करणारे कोणी नाहीत, आणि ऐकणारेही कोणी उरले नाहीत, अशी तिखट टिप्पणी करत त्यांनी महायुती सरकारवर सरळ प्रहार केला.

ते पुढे म्हणाले, “निवडणुकांच्या अगोदर पैशाच्या पोत्यांचा मारा सुरू आहे. हा पैसा नेमका कुठून येतो? याचं उत्तर राज्यकर्त्यांकडे नाही. सत्ता मिळाली की माज, अहंकार आणि भ्रष्टाचार कसा डोकं वर काढतो याचा अनुभव महाराष्ट्र घेतोय.” त्यांच्या मते आज परिस्थिती अशी आहे की एकही मंत्री गावोगाव फिरत नाही, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत नाही आणि शहरातल्या नागरिकांशी संवाद साधणं तर दूरची गोष्ट राहिली.

“हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक”

उद्धव ठाकरेंनी मुंबईतील प्रदूषणावरही सरकारला खडे बोल सुनावले. गेल्या काही वर्षांत शहरात निर्माण झालेला धूर, धूळ आणि हवेत मिसळलेले विषारी घटक हे केवळ पर्यावरणीय कारणांमुळे नसून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट आडमुठेपणाचे धनी असल्याचं त्यांनी सांगितलं. “हवेतली ही काळी ढगं म्हणजे भ्रष्टाचाराच्या फुटलेल्या ज्वालामुखीचे ढग आहेत, ज्यांनी महाराष्ट्र व्यापायला सुरुवात केली आहे,” असं ते म्हणाले.

ते म्हणाले, “मी मुख्यमंत्री झाल्या क्षणी आरे कारशेड थांबवली होती. पण आज त्याच झाडांची कत्तल करून कंत्राटदारांच्या खिशात भर घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.” संजय गांधी नॅशनल पार्कमधील बदल आणि तपोवन भागातील उभारणीबाबतही त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.

तपोवन परिसरातील साधुग्राम प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, “आमचा साधुग्रामाला विरोध नाही, पण हजारो झाडांचा संहार करून पवित्र परिसर उद्ध्वस्त करण्याचा आमचा तीव्र विरोध आहे.” त्यांच्या मते हिंदुत्वाच्या नावावर चाललेला हा भ्रष्टाचाराचा खेळ लोकांच्या आस्थेला धक्का देणारा आहे.

“तोंडात राम आणि बगलमध्ये अदानी हेच भाजपचे खरे हिंदुत्व,” असा सडेतोड आरोप करत त्यांनी सांगितलं की तपोवन हा प्रभू रामचंद्रांच्या पवित्र पावलांनी भारलेला प्रदेश असून अशा ठिकाणाचा विनाश हा पुण्याच्या नावाखाली चाललेला केविलवाणा व्यवहार आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now