“उद्धवसाहेब तुम्ही लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्या, उद्योग जगत तुमच्या पाठीशी आहे”

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबधितांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखण्यात आल्या असून आता काही कडक निर्बंध सुद्धा घालण्यात आले आहे.

आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत संवाद साधला आहे. त्यावेळी जिथे शक्य तिथे वर्क फ्रॉम होम केले पाहिजे, कामगार आवश्यक असेल तेवढेच बोलवावे, कंत्राटी कामगार असे तर कुटुंबाची जबाबदारी घेत त्याच्या रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

आता मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही उपस्थित असलेल्या व्यापाऱ्यांनी दिली आहे.

सध्या लोकांचा जीव वाचवणे महत्वाचे आहे. शासन जो निर्णय घेईल, त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी आहे, असेही तिथे उपस्थित असलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा संवाद व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्यापाऱ्यांशी साधला होता.

दरम्यान, या व्हिडीओ कॉन्फरन्सला उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, तसेच अधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.