ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील सभेतून भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आज मी महाराष्ट्रातील भाजपला तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत विचारतोय, भाजप मिंध्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार का?’
तसे असेल तर मिंधेंना नेता मानून आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे भाजपने जाहीर करावे. जर भाजपाला असं वाटत असेल की, आपण शिवसेनेला ठाकरेंपासून शिवसेनेला तोडू शकतो. तर तुमचे ५२ नव्हे तर १५२ कुळं खाली उतरली तरी कुणी शिवसेना ठाकरेंपासून तोडू शकत नाही.
“मी म्हणतो, लगेच निवडणुका घ्या. हिम्मत असेल तर तुम्ही मोदींच्या नावाने मते मागा. मी माझ्या वडिलांच्या नावाने मत मागतो. बघूया महाराष्ट्र कोणाला मतदान करतो. एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व शून्य असताना ते गद्दारी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
त्यांना अजूनही माझ्या वडिलांचे नाव वापरावे लागते, हा तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात जन्म दिला. ‘त्या राजकारणात जन्म देणाऱ्या आईला भोसकणारे हे सगळे चोर धनुष्यबाण घेऊन फिरत आहेत’, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले.
भाजप-शिंदे गटातील जागावाटपावरून उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. “बावनकुळे साहेब, तुमच्या नावाएवढ्या किमान 52 जागा तरी तुम्ही मिंधे गटाला द्या. त्यांना थोडीतरी किंमत द्या,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आहेत. त्या बावनकुळे यांनी मिंधे गटाला फक्त 48 जागा देणार असल्याचे सांगितले. पण अहो बावनकुळे साहेब, तुमच्या नावाएवढ्या 52 जागा तरी द्या.
हे सगळे हरामखोर आहेत जे इतक्या जिवंत माणसांचे प्रेम सोडून तुमच्या कळपात शिरले. तुम्ही त्यांना ४८ जागा देऊन बोळवणार का?” अशा शब्दांत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाची भर सभेत खिल्ली उडवली.
मालेगाव येथील एमएसजी (मसगा) महाविद्यालयाच्या मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राहुल गांधींनी प्रश्न विचारला होता की अदानींच्या कंपनीत गुंतवलेले 20 हजार कोटी रुपये कुणाचे आहेत?’ याचे उत्तर भाजपकडे नाही.
हिंडेनबर्ग हजारो कोटींचे घोटाळे बाहेर काढत आहे. पण, भाजप त्यांना उत्तर देत नाही. पंतप्रधानही उत्तर देत नाहीत. आमच्याकडे ईडी, सीबीआय सर्वसामान्यांनावर धाडी घालत आहे. पण अदानीचे घोटाळे उघडकीस येत आहेत. तिथे कुणी धाडी घालत नाही.
मला राहुल गांधींना एकच सांगायचे आहे, तुम्ही कन्याकुमारीहून काश्मीरला चालत आलात. संजय राऊत आणि आम्ही सुद्धा तुमच्या सोबत होतो. हा लोकशाहीचा लढा आहे. मात्र, स्वातंत्र्यसैनिक सावरकर हे आमचे देव आहेत. त्यांचा अपमान करणे आम्हाला मान्य नाही. लढायचे असेल तर देवांचा अपमान सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.