मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून जोरदार राजकारण पेटले आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. तसेच मराठा समाजाला स्थगिती दिल्यापासून विरोधक ठाकरे सरकारला लक्ष करत आहे.
याच पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि शशिकांत पवार यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘मराठा समाजाला वंचित ठेवता कामा नये. महाराष्ट्र एकत्र ठेवायचा असेल तर सर्व जातींना एकत्र केलं पाहिजे. मेहरबानी करून मराठा मुद्द्याला फाटे फोडू नका, नाहीतर महाराष्ट्राचे तुकडे नक्की होतील, असे उदयनराजेंनी यांनी म्हंटले आहे.
उध्दव ठाकरे मराठाद्वेषी…
भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हे मराठाद्वेषी आहेत. ते जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोवर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही,’ असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण हे राज्य सरकारसाठी प्राधान्याचे मुद्दे नाहीत. त्यामुळे हे सरकार घालवल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे राणे यांनी म्हटंले.
मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा…
काही दिवसांपुर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला होता. ‘सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार असल्याचे पाटील म्हणाले.
तसेच आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा. अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशाने पाहिलं आहे, असे पाटील म्हणले होते.