Share

Uday Samant : काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही, वडेट्टीवारांनी धनुष्यबाण घेऊन सत्तेत यावं, उदय सामंतांची थेट ऑफर

Uday Samant : सत्तेच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार खळबळ उडवत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना थेट मंचावरून शिवसेना शिंदे गटात प्रवेशाची उघड ऑफर दिली. त्यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस पक्षात काहीच उरले नाही आणि विदर्भातील सक्षम नेतृत्वाला योग्य सन्मान द्यायचा असेल तर धनुष्यबाण हातात घेऊन सत्तेची वाटचाल करावी, अशी टिप्पणी सामंत यांनी केली.

यावेळी त्यांनी सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mehtre) यांचा दाखला देत, दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिलेल्या या ज्येष्ठ नेत्यांना अखेर नवा “आशेचा किरण” म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसले, अशी टिपणी केली. त्याच धर्तीवर वडेट्टीवार यांनीही योग्य दिशेने पाहावं, असा सल्ला त्यांनी थेट दिला.

काँग्रेसवर तिखट टीका

उदय सामंत यांनी पुढे बोलताना काँग्रेस पक्षावर सडेतोड टीका केली. “काँग्रेसमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही, पण वडेट्टीवार हे विदर्भातील एक मजबूत नेतृत्व आहे. त्यांना शिवसेनेत योग्य मान मिळेल,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी रावण आणि लंकेचं उदाहरण देत “इतिहास वाचला नसेल” असा टोमणाही वळवला.

सामंत यांनी सांगितले की वडेट्टीवार हे धनुष्यबाण घेतले तर त्यांची राजकीय उंची आणखी वाढेल. “ही माझी विनंती नाही, तर स्पष्ट अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.

सिंधुदुर्गातील मतभेद गैरसमजातून 

राज्यात काही ठिकाणी शिवसेनेत अंतर्गत मतभेद झाले असल्याच्या चर्चेवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना, सिंधुदुर्गातील काही मुद्दे हे फक्त गैरसमजांचे परिणाम असल्याचे सांगितले. “मी कधीच कोणाची उनी-दूनी काढलेली नाही. मी लोकांची ऐकतो, पण कुणाविरुद्ध काम करत नाही,” असे त्यांनी सांगितले.

त्यांच्या मते, निवडणूक संपल्यानंतर सर्व मतभेद मिटतील आणि युतीचे वातावरण पुन्हा सामान्य होईल. सिंधुदुर्गातील लढत मैत्रीपूर्ण असून, तिथे थोडेफार मागेपुढे झाले असले तरी परिस्थिती लवकर सुरळीत होईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

“युती टिकवणे ही सर्वांची जबाबदारी”

युती राजकारणावर बोलताना सामंत म्हणाले की, फक्त दोन तारखेपर्यंतच नव्हे तर संपूर्ण कालावधीभर युती मजबूत ठेवणे ही सर्व नेत्यांची जबाबदारी आहे. तीनही प्रमुख नेते परिपक्व असून निर्णय विवेकाने घेतले जातील, असे ते म्हणाले.

सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांबद्दलही त्यांनी भाष्य करत सांगितले की आगामी निवडणुकांवर कोणतीही आडकाठी नाही, पण पन्नास टक्क्यांच्या आरक्षणासंबंधीचा निकाल काही अटींवर आधारित असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now