Suresh Dhas : बीड – मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला तुरुंगात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला, ज्यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जबर मारहाण करण्यात आली. हा हल्ला बबन गित्ते गँगच्या महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी केल्याचे बोलले जाते. भाजप आमदार *सुरेश धस यांनी हा प्रकार उघड करताच मोठी खळबळ उडाली.
कारागृहातील वाद कशामुळे झाला?
बीड जिल्हा कारागृहात दोन गटांमध्ये आज सकाळी वाद झाला. मात्र, हे गट कोणते होते याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तुरुंग प्रशासनाच्या त्वरित मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टळला, असे सांगण्यात आले.
जेल प्रशासनाची पुष्टी
कारागृह प्रशासनाने *मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींच्या गटांमध्ये वाद झाल्याचे स्पष्ट केले आहे. या तुरुंगात *वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि अन्य आरोपी दाखल आहेत. वादानंतर तुरुंगातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
घटनेची जोरदार चर्चा
हा वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत चर्चा सुरू असून परळीतील आरोपींच्या गटांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.