मेट्रो मार्गासाठी अडथळा ठरणारे पुणे विद्यापीठ चौकातील दोन उड्डाणपूल या आठवड्यात पडणार

 

पुणे। हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गासाठी पुणे विद्यापीठ चौकातील दोन उड्डाणपूल येत्या आठवड्यात पाडण्यात येणार आहेत. या संदर्भातील आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिले आहेत.

मेट्रो मार्गात अडथळा ठरणारा सावित्रीबाई फुले विद्यापीठ तसेच ई-स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल पाडण्याला महापालिकेने सोमवारी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) दिले आहे. त्यानुसार आता पूल पाडण्याचे आदेश पीएमआरडीएने दिले आहेत.

हे दोन्ही पूल पाडण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या दरम्यान वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग खुले केले जाणार आहेत, असे देखील सांगण्यात आले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या निर्मितीसाठी विद्यापीठ चौकात अस्तित्वात असलेला आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत आहे. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडण्याचे नियोजन पीएमआरडीएकडून करण्यात आले होते.

त्याला महापालिकेने लेखी मंजुरी दिली होती. प्राधिकरणास पूल पाडण्यास यापूर्वीच स्थायी समितीने मान्यता दिली होती. मुख्य सभेपुढे मान्यतेसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

परंतु कोरोनामुळे मुख्य सभा होत नसल्यामुळे सर्व पक्षनेत्यांची स्वाक्षरी घेऊन अखेर महापालिकेने ही परवानगी दिली आहे. दरम्यान, परवानगी देताना मुख्य सभेत जो निर्णय होईल, तो प्राधिकरणावर बंधनकारक राहणार असल्याचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.