Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. तिच्या वडिलांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि काही हाय-प्रोफाईल व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, याआधी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाच्या वडिलांनाच तिच्या नैराश्याला जबाबदार ठरवण्यात आले होते.
नेमकं काय घडलं होतं?
८ जून २०२० रोजी दिशा सालियनने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. तपासानंतर पोलिसांनी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यात असे नमूद होते की, दिशाच्या काही प्रोजेक्ट्स अयशस्वी झाले होते, मित्रांशी वाद झाले होते, आणि तिच्या वडिलांच्या वर्तनामुळे ती तणावात होती. दिशाने वडिलांना जाब विचारल्यानंतर ती आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत राहायला गेली होती.
घटनाक्रम आणि पार्टीचा रात्रीचा प्रसंग
८ जूनच्या रात्री दिशा सालियन आपल्या मित्रांसह मालाड येथील फ्लॅटमध्ये होती. तिचा होणारा नवरा रोहन रॉय आणि काही मित्र त्या ठिकाणी उपस्थित होते. पार्टीदरम्यान, दिशा तणावग्रस्त वाटत होती. मध्यरात्री ती अचानक बेडरूममध्ये निघून गेली. काही वेळानंतर तिच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला, पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी दरवाजा तोडल्यावर दिशा बेडरूममध्ये नव्हती. खिडकी उघडी दिसल्याने खाली पाहिले असता ती इमारतीच्या खाली पडलेली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
शवविच्छेदन आणि पोलिस तपासाचे निष्कर्ष
शवविच्छेदन अहवालानुसार, तिच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या आणि हा अपघाती मृत्यू होता. पोलिस तपासात तिचे मित्र, कुटुंबीय आणि होणाऱ्या नवऱ्याचे जबाब नोंदवण्यात आले. सर्वांनी तिच्या मानसिक तणावाबाबत सांगितले. पोलिसांनी तिच्या आत्महत्येमागील प्रमुख कारणे आर्थिक नुकसान, कौटुंबिक तणाव आणि वैयक्तिक समस्या असल्याचे नमूद केले.
नवीन आरोप आणि प्रकरणात ट्विस्ट
सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्या म्हणून बंद केले असले तरी, दिशाच्या वडिलांनी आता पुन्हा नवीन याचिका दाखल केली आहे. त्यांनी काही बड्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पुढील तपासात कोणते नवे खुलासे होतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.