लॉकडाऊनबाबत तुकाराम मुंढेंचा नागपूरकरांना इशारा; म्हणाले..

 

नागपूर। राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी आज पत्रकार परिषद घेत नागपूरकरांना लॉकडाऊनबाबत इशारा दिला आहे.

“नागरिक नियमांचे पालन करत नाहीत, आजार लपवतात, त्यामुळे नागपुरात मृत्यू वाढले आहेत. पण नागपुरात अजूनही परिस्थती नियंत्रणात आहे. मात्र, आजच्या स्पीडने कोरोना रुग्ण वाढले, तर नागपुरात १० हजारापेक्षा जास्त रुग्ण व्हायला वेळ लागणार नाही.

त्यामुळे वेळ आली तर मी फक्त लॉकडाऊनच करणार नाही तर त्यासोबत कर्फ्यूही लावेन”, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. नागरिकांनी ही नियमावली पाळली पाहिजे.

दुकानांमध्ये फक्त पाच लोकांना परवानगी आहे. मात्र, पाच ऐवजी दहा जण असल्याचे मी स्वत: बघितले आहे. फुटपाथवर गर्दी होते. ऑटो रिक्षाला परवानगी नाही.

परंतु तरी देखील त्या सर्रास सुरु आहेत. दुचाकीवर एकालाच परवानगी असताना दोन ते तीन जण एकाच दुचाकीवर जातात. मास्क वापरले जात नसल्याचे देखील मुंढेंनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, नागपूरात लॉकडाऊन करायचे असल्यास १४ ते १५ दिवसांचे करणार, सोबत कर्फ्यू असेल. लॉकडाऊन करण्यापूर्वी २-३ दिवस आधी लोकांना कळवण्यात येईल. लॉकडाऊनदरम्यान कोणालाही बाहेर पडता येणार नाही, असेही मुंढे यांनी सांगितले आहे.

सुरूवातीला कोरोनाने भारतात शिरकाव केला, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तीन टप्यात लॉकडाऊन घोषित केले होते. त्यावेळी नागरिकांनीही बाहेर न फिरता घरी राहून लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद दिला.

तेव्हा कोरोनाची भीती लोकांना वाटत होती. मात्र ज्यांना कोरोना झाला ते बरे होऊन घरी यायला लागल्यावर कुठेतरी ती भिती नाहीशी झाली. त्यामुळेच आता कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.