नितीन गडकरींनी केलेल्या आरोपांवर तुकाराम मुढेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नागपूर । सीईओपद बळकावल्याचा आरोप करत नितीन गडकरी यांनी नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. या आरोपांवर आता मुंढे यांनी मौन सोडले आहे.

आयुक्त मुंढे यांनी या संदर्भात एक पत्रक काढून भूमिका स्पष्ट केली आहे. मी नागपूरमध्ये मनपा आयुक्त म्हणून 28 जानेवारी 2020 रोजी रुजू झालो. मनपा आयुक्त हे स्मार्ट सिटीचे पदसिध्द संचालक असतात.

रामनाथ सोनावणे हे स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी या पदाचा राजीनामा स्मार्टसिटीचे चेअरमन प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे दिला. त्यानंतर मला स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळण्याचे निर्देश दिले.

शासन निर्णयानुसार आजपर्यंत मी पदाचा कार्यभार सांभाळत आहे. असे मुंढे यांनी सांगितले आहे. स्मार्टसिटीचा सीईओपदाचा कार्यभार सांभाळतांना मी दैनंदिन कामकाज पार पाडत आहे.

या कालावधीत ट्रान्सफर स्टेशनचे टेंडर रद्द करून बायो मायनिंगचे टेंडर जाहीर केले होते. याबाबत चेअरमन परदेशी यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला होता. तसेच हे जाहीर झालेले बायो मायनिंगचे टेंडर अजूनही अंतिम झालेले नाही.

या दोन्ही बाबी संचालक मंडळाच्या प्रस्तावित बैठकीत ठेवण्यात येणार आहेत, असेही मुंढेंनी सांगितले आहे. या काळात कार्यालयीन खर्च आणि वेतनाच्या देयकांशिवाय केवळ एकच चालू बील देण्यात आले आहे.

यामध्ये कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही. संचालक मंडळाची बैठक कोरोनामुळे होऊ शकलेली नाही, असा खुलासा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. दरम्यान यावरून जोरदार राजकारण पेटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.