Rohit Pawar on Nashik Tree Cutting: नाशिकमध्ये (Nashik City) 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आल्याने तपोवन परिसरावर (Tapovan Area Nashik) मोठं संकट ओढवल्याची भावना स्थानिकांमध्ये पसरली आहे. तब्बल 1150 एकर जागेवर साधुग्राम उभारण्याचं काम गतीनं सुरू करण्याच्या तयारीत असताना, साधू-महंतांच्या तात्पुरत्या वास्तव्याकरिता होणाऱ्या बांधकामासाठी सुमारे 1800 झाडं तोडण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या वृक्षतोडी विषयामुळे नाशिककरांमध्ये आणि पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अनेकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन सुरू केलं आहे. काही मान्यवर कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निर्णयावर नाराजीचं भूमिकापत्र दिलं आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) आमदार रोहित पवार (Rohit Pawar NCP) यांनी कुंभमेळा मंत्री असलेल्या गिरीश महाजनांवर (Girish Mahajan) जोरदार प्रहार केला. रोहित पवार यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून राज्य सरकारवर हल्लाबोल करत सत्ताधाऱ्यांचे नियोजन, प्राधान्यक्रम आणि तपोवनाबाबतचं कथित दुर्लक्ष यावर कडाडून टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तपोवनासारख्या ऐतिहासिक व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जागेची किंमत सत्तेत असलेल्या मंडळींना कळतच नाही. कुंभमेळ्याच्या नावाखाली जमीन रिकामी करण्याचा आणि नंतरच्याच काळात ती काही संस्थांना लीजवर देऊन फायदा मिळवण्याचा प्रकार इथे राबवला जाणार असल्याचा त्यांनी थेट आरोप केला.
रोहित पवारांचा सरकारवर प्रहार
आपल्या पोस्टमध्ये पवार म्हणतात की, भ्रष्टाचारालाच भक्ती आणि सत्तेलाच श्रद्धा मानणाऱ्यांना तपोवनाचं खऱ्या अर्थानं महत्त्व समजण्याची अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. नाशिकमधील सत्तेत असलेली मंडळी केवळ नफा-केंद्रित योजना राबवत असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटलं की, या संपूर्ण प्रस्तावामागे तपोवनाची जमीन हस्तगत करण्याचा छुपा डाव आहे. “कुंभमेळा हा केवळ निमित्त, पण खरी स्पर्धा जमिनीच्या व्यवहाराची आहे,” असा रोखठोक आरोप पवारांनी केला.
“नगरपालिका बिनविरोध केली म्हणून तपोवनही खाली करता येईल?”
पवारांनी केलेला सर्वात गंभीर आरोप म्हणजे गिरीश महाजन यांच्या राजकीय पद्धतीवर. ते म्हणाले की, “गुंडांच्या मदतीनं एखादी नगरपालिका बिनविरोध केली म्हणून तपोवनासारखी पवित्र जागा त्याच पद्धतीनं खाली करता येईल, असा समज ज्यांच्या मनात असेल, तो हा तथाकथित संकटमोचकांचा गोड गैरसमज आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे नाशिकच्या राजकारणात आणि कुंभमेळ्याच्या तयारीत नवीन खळबळ उडाली आहे.