Pahalgam attack : जम्मू-काश्मीरमधील निसर्गरम्य व पर्यटकांनी सदैव गजबजलेला पहलगाम परिसर सध्या दहशतवादाच्या छायेत अडकला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटन व्यवसायाला जबर धक्का बसला असून हजारो स्थानिकांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. एकीकडे पहलगाम ओसाड होत असताना, दुसरीकडे वैष्णोदेवी यात्रेच्या भाविकांची संख्याही लक्षणीयरीत्या घटली आहे.
पहलगाम पर्यटनाला दहशतीचा फटका
काश्मीरमधील “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन खोऱ्यात २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात २६ जणांचा जीव गेला. पर्यटन हंगाम एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान सुरू राहतो. मात्र हल्ल्यानंतर पर्यटकांनी पहलगामकडे पाठ फिरवली असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.
५,००० पोनीवाले आणि ६०० वाहनचालक बेकार
पोनीवाला असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल वहीद वानी यांनी सांगितले की, “आजघडीला पाच हजारांहून अधिक घोडेवाले आणि सुमारे सहाशे वाहनचालक पूर्णपणे बेरोजगार झाले आहेत. आमचा उदरनिर्वाह संपूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून आहे. दहशतवाद्यांनी केलेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे, पण पर्यटकांनी परत येणे थांबवू नये. प्रशासनानेही आम्हाला मदतीचा हात द्यावा.”
सीमेवरील भीती आणि असुरक्षितता
सीमाभागांतील लोक आजही गोळीबार व तोफगोळ्यांच्या धोक्याखाली जीवन जगत आहेत. एक स्थानिक रहिवासी म्हणतो, “घरामागे केलेल्या बंकरमध्ये आम्ही जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही गोळ्यांच्या माऱ्यापुढे अपुरा पडतो.” शस्त्रसंधी असली तरी सीमेपलीकडून होणारा धोकाही कायम आहे.
वैष्णोदेवी यात्रेवरही परिणाम
जम्मू-काश्मीरमधील अस्थिरतेचा फटका केवळ पहलगामपुरता मर्यादित नाही, तर माता वैष्णोदेवी यात्रेवरही त्याचे पडसाद उमटले आहेत. ६ मे रोजी १२,९१७ भाविक कटऱ्यात दाखल झाले होते, तर ७ मे रोजी, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दिवशी ही संख्या १२,७६० होती. मात्र त्यानंतर भाविकांची संख्या झपाट्याने घटली. सात दिवसांनंतर हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असली, तरीही भाविकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
प्रशासनाच्या कृतीची गरज
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक, पर्यटन व्यवसायिक आणि धार्मिक स्थळांवरील व्यवस्थापन यांनी सरकारकडून ठोस उपाययोजना व मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. सुरक्षा यंत्रणांनीही परिसरात गस्त वाढवली असून पर्यटकांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी जनतेच्या विश्वासाचं पुनरुज्जीवन महत्त्वाचं ठरणार आहे.
दहशतवाद्यांचा हेतू शांततेला तडा देण्याचा असतो, मात्र स्थानिकांचे म्हणणे आहे की अशा कृत्यांना बळी न पडता पर्यटन व श्रद्धास्थळांकडे पुन्हा लोकांनी वळावे, हाच खरा दहशतवाद्यांवरचा विजय ठरेल.
tourist-numbers-drop-after-pahalgam-attack