वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार- उदयनराजे

सातारा । राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण पेटले आहे. सुप्रीम कोर्टाने नुकतीच आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यावर आता भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजे म्हणाले, मी राजकारण करत नाही, पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच अशी भावना भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली आहे. सर्व समाजांबद्दल मला आदर आहे.

प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, न्यायालयानेही सर्व लोकांना समान अधिकार द्यावेत न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणे स्वाभाविक आहे, समाजात अनेक लोक गरीब आहेत.

मराठा आरक्षणावर सरकारने काही केले तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार, हे मी मनापासून सांगतोय, मी कधीही राजकारण केले नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही समाजावार अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठीही लढणार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तरी राजीनामा देईन, पदावरुन राहून आपण काय करु शकत नसलो तर त्याचा उपयोग काय? वेळ आली तर राजीनामा देईन असे त्यांनी सांगितले.

उदयनराजे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते मराठा आरक्षणावरून आक्रमक झाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.