टायगर अभी जिंदा है; ज्योतिरादित्य शिंदे यांचे कमलनाथ यांना उत्तर

मध्यप्रदेश। मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाचा गुरूवारी विस्तार झाला. या विस्तारानंतर शिंदे यांनी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

“टायगर अभी जिंदा है,” असे म्हणत ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ व दिग्विजय सिंह यांना उत्तर दिले आहे. मध्य प्रदेश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांना उत्तर दिले आहे.

“मला कमलनाथ वा दिग्विजय सिंग यांच्याकडून कोणतेही प्रमाणपत्र नकोय. त्यांनी १५ महिन्यांच्या काळात राज्याला लूटलं आहे. त्यांनी सगळ काही स्वतःसाठी केलं. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, टायगर अभी जिंदा है,” असे ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्ताराविषयी बोलताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, “ज्या मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते जनतेसाठी काम करतील. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली १०० दिवसांपूर्वी सत्तेत आलेलं सरकार कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहे.

शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे. पुढील चार वर्षातही असंच काम करत राहू. ज्या बारा व्यक्तींनी शपथ घेतली आहे. ते सर्व पोटनिवडणुकीत विजयी होतील,” असा विश्वासही ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्चमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, गुरूवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात ज्योतिरादित्य शिंदे शिवराज सिंह चौहान यांना भारी ठरले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.