Pandharpur : पंढरपूर तालुक्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे अनेक भागांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशाच एक घटनेत पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे भीमा नदीच्या पात्रात वसलेल्या महादेव मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन महाराज अडकले होते.
तीन महाराजांची सुखरूप सुटका
सुभाष ढवण, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे या तीन साधूंची नावे आहेत. हे तिघेही दररोजप्रमाणे सकाळी महादेव मंदिरात पूजेसाठी गेले होते. मात्र, पावसामुळे अचानक नदीचे पाणी वाढल्याने मंदिर परिसर जलमय झाला आणि ते बाहेर येऊ शकले नाहीत. परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांमार्फत प्रशासनाशी संपर्क साधला.
आपत्ती व्यवस्थापन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बोटीद्वारे महाराजांसह मंदिरात असलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लालादेखील सुखरूप बाहेर काढण्यात आले. मंदिर थोडे उंचावर असल्यामुळे त्याठिकाणी पाणी पोहोचले नव्हते, पण चारही जण बाहेर पडण्यास असमर्थ असल्याने ही मदत आवश्यक ठरली.
अकलूजमध्ये नीरा नदीला पूरजन्य स्वरूप
दरम्यान, अकलूजमध्येही नीरा नदीने आपले उग्र रूप दाखवले आहे. नेहमी उन्हाळ्यात कोरडी राहणारी ही नदी यंदा मे महिन्यातच दुथडी भरून वाहत आहे. परिणामी, अकलाई मंदिर परिसरात पाणी शिरले असून आज अमावस्येनिमित्त दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना ही दृश्ये पाहायला मिळाली. नीरेच्या अशा रूपाचे दर्शन पहिल्यांदाच झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
माळशिरस तालुक्यालाही मोठा फटका
माळशिरस तालुक्यात देखील जोरदार पावसाचा मोठा फटका बसला आहे. गेल्या दहा दिवसांत 256 मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील बहुतांश बंधारे पाण्याखाली गेले असून, ओढे आणि नाले वाहू लागले आहेत. दहिगाव येथील पुलावर चार ते पाच फूट पाणी साचल्याने सकाळी वाहतूक ठप्प झाली होती, मात्र नंतर पाणी ओसरल्यानंतर ती पूर्ववत झाली आहे. या पावसामुळे ओढ्यांच्या किनाऱ्यावरील अनेक भराव खचले असून, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
एकूणच चित्र चिंताजनक, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
या तिन्ही तालुक्यांतील पूरपरिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकिनारी जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज असून, कोणतीही आपत्कालीन मदत आवश्यक असल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
three-maharajas-trapped-in-pandharpur-temple-finally-released