Pune : पुणे जिल्ह्यातील (Pune District) दौंड तालुक्यातील (Daund Taluka) बिरोबावाडी भागात 26 जून रोजी एक अति दुर्दैवी आणि थरारक घटना घडली. एका तरुणावर त्याचे चुलत भाऊ आणि नातेवाईकांनी भरदिवसा अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. हल्लेखोरांनी पीडित तरुणाचे हात आणि पाय इतक्या निर्घृणपणे मारहाण करून तोडले की त्याची प्रकृती गंभीर झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
चुलत भावांचा राग थेट जीवघेण्या हल्ल्यात
कैलास हगारे(Kailas Hagare) असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. यवत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी दुपारी कैलास त्यांच्या मुलीसोबत शेतात बाजरीला पाणी देण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांच्या चार नातेवाईकांनी अचानक शेतात धाव घेत हत्यारांसह पाठलाग करत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
मुलीसमोर वडिलांवर थरारक हल्ला
कैलास यांच्या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, ती शेतातील खोली साफ करत असताना वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आला. बाहेर येऊन पाहिलं असता, सोमनाथ दगडू हगारे, गणेश सोमनाथ हगारे, प्रविण सोमनाथ हगारे आणि नंदा सोमनाथ हगारे यांनी हातात तलवार, कुऱ्हाड, आणि कोयता घेऊन कैलास हगारे यांच्यावर धाव घेतली. “आज याला संपवायचंच!” असं ओरडत त्यांनी हल्ला सुरू केला.
लोखंडी खोऱ्याने तोडले हातपाय
प्रविण हगारेने त्याच्या आई नंदा हगारेकडून लोखंडी खोरे आणून घेतलं आणि ते कैलास यांच्यावर वापरलं. त्याचे हातपाय पात्याच्या बाजूने तोडण्यात आले. मनगटापासून हात वेगळा झाला आणि डावा पाय नडगीपासून कापला गेला. गणेश हगारेने त्यानंतर उजव्या पायावरही हल्ला केला.
मुलीला अडवून केली मारहाण, आजी आल्यानंतर हल्लेखोर पळाले
कैलास यांची मुलगी “पप्पांना सोडून द्या!” असा आक्रोश करत होती. मात्र तिला प्रतिक्षा आणि प्रांजल हगारे या दोघींनी रोखून ठेवत मारहाण केली. अखेर आजी विहिरीजवळून आल्यावर आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेले. जाताना त्यांनी मोबाईल आणि हल्ल्यासाठी आणलेली शस्त्रंही सोबत नेली.
जखमी अवस्थेतील वडिलांना पाहून मुलीनं गावात जाऊन काही नातेवाईकांना मदतीसाठी बोलावलं, मात्र भीतीपोटी कोणीही मदतीला धावलं नाही. शेवटी शंकर गावडे यांचं सहकार्य मिळालं आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. नंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कैलास हगारे यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं.