केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ईडीच्या कारवाईबाबत विधान करून विरोधकांना टोला लगावला आहे. म्हणाले, भाजपमध्ये गेल्यावर ईडीपासून सुटका मिळते ही अफवा विरोधी पक्षांनीच पसरवली आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा म्हणाले, ज्या नेत्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे, त्यांची चौकशी भाजपात आल्यावर देखील थांबणार नाही. ईडीने कारवाई केल्यानंतर चोरी, भ्रष्टाचार केला नाही असं म्हणायचे आणि चौकशी झाल्यावर मग कसे जेलमध्ये जातात? असा सवाल त्यांनी केला.
तसेच म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. पण एकही मंत्र्यावर आरोप झाला नाही. मात्र काही राज्यात विरोधी पक्षांची सत्ता आहे तेथे अनेक मंत्री, आमदार, खासदार वेगवेगळ्या आरोपात अडकले आहेत. ज्यांच्यावर कारवाई होते ते भाजपच्या नावाने ओरड मारतात मग चोरी कशासाठी करायची असा सवाल त्यांनी केला.
मिश्रा म्हणाले, ज्यांच्या चौकशी सुरू आहेत त्याची कुठेही चौकशी थांबणार नाही. भाजपकडे आले म्हणून चौकशी थांबतात हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. जर कोणालाही चौकशीवर संशय असेल किंवा समाधानी नसाल तर ते यंत्रणे विरोधात न्यायालयात जाऊ शकतात.
विरोधी पक्षांवर टोला लगावत म्हणाले, विरोधी पक्षच अशा अफवा पसरवत असतो. भाजपमध्ये गेल्यावर नेते सुटतात असे सामान्य माणूस म्हणत नाही, त्यांना काही देणे घेणेही नसते. पण विरोधी पक्षच या अफवा पसरवत असतो. कोणी कितीही ओपिनियन पोल काढू दे पण राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ४५पेक्षा जास्त जागा निवडून येतील असे मिश्रा म्हणाले.
तसेच सध्या महाराष्ट्रात असणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारबद्दल बोलताना म्हणाले, शिंदे फडणवीस सरकार चांगले काम करत असून ते यापुढे देखील चांगले काम करेल असा विश्वास आहे. दरम्यान, मिश्रा यांच्या या पत्रकार परिषदेत अतुल काळसेकर, महेश सारंग, आदी उपलब्ध उपस्थित होते.