Raj Thackeray : मुंबई : गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर परखड भूमिका मांडली. मुंबईतील नद्यांपासून महाकुंभ मेळ्यापर्यंत अनेक विषयांवर भाष्य करताना त्यांनी जंगलतोडीचा मुद्दाही उपस्थित केला. अंतिमसंस्कारासाठी लाकडाचा वापर होत असल्याने झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राज ठाकरे काय म्हणाले?
“ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांचे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे फलक सर्वत्र दिसतात. मात्र, हिंदूंच्या अंतिमसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर होतो. यासाठी जंगलतोड अपरिहार्य ठरते. *पर्याय म्हणून विद्युत दाहिनीचा वापर करायला हवा, मात्र काहीजण परंपरेच्या नावाखाली याला विरोध करतात. देशभर *विद्युत दाहिनी अनिवार्य केली, तरच जंगलं वाचतील,” असे मत राज ठाकरे यांनी मांडले.
सयाजी शिंदे यांनी दिला पाठिंबा
पर्यावरणप्रेमी अभिनेते *सयाजी शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. निसर्गरक्षणासाठी कार्यरत असलेल्या शिंदे यांनी सांगितले की, *”राज ठाकरेंचे विचार नेहमीच प्रभावी असतात. अंतिमसंस्कारासाठी लाकडाऐवजी विद्युत दाहिनीचा वापर करण्याचा त्यांचा विचार संपूर्ण मानवजातीसाठी महत्त्वाचा आहे.”**
शिंदे पुढे म्हणाले, “एका व्यक्तीच्या दहनासाठी सुमारे ३०० किलो लाकूड लागते. आधीच जंगलं वेगाने नष्ट होत असताना अशा परंपरांमुळे झाडांची आणखी मोठ्या प्रमाणावर कत्तल होते. त्यामुळे प्रत्येकाने विचार करायला हवा की, ‘मी गेल्यावर विद्युत दाहिनीतच दहन करावे, जेणेकरून पुढच्या पिढ्यांसाठी झाडं शिल्लक राहतील.’”
पर्यावरण वाचवण्यासाठी पुढाकार गरजेचा
विनोद कुमार शुक्ल यांच्या कवितेचा संदर्भ देत सयाजी शिंदे म्हणाले, “माझ्या मुलांसाठी तरी एखादं झाड लावा.” झाडं, अन्न, पाणी आणि ऑक्सिजन संपल्यास मानवी अस्तित्वच धोक्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी मांडलेल्या विचाराची अंमलबजावणी झाली, तर पर्यावरण बचावाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.