Share

Sujat Ambedkar Pune Crime: “सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी अ‍ॅट्रोसिटी तक्रार घेत नाहीत” , सुजात आंबेडकरांचा पोलिसांवर घणाघात

Sujat Ambedkar Pune Crime:  पुणे (Pune) शहरात कोथरूड (Kothrud) पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींना पाच तास ताब्यात ठेवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील एका प्रकरणाच्या तपासासाठी या मुलींना कोथरूडमध्ये आणण्यात आले होते. मात्र, तपासाच्या नावाखाली पोलिसांनी त्यांचा अपमान, जातीवाचक शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचे पीडितांचा आरोप आहे.

या तक्रारीसाठी मुलींनी पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. रविवारी रात्री वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar), रोहित पवार (Rohit Pawar), प्रशांत जगताप (Prashant Jagtap) आणि इतर सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या देऊन बसले. रात्री साडेतीन वाजेपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, तरीही गुन्हा नोंदवला गेला नाही.

सुजात आंबेडकरांचा आरोप 

या घटनेवर संताप व्यक्त करताना सुजात आंबेडकर यांनी सांगितले की, “पोलीस दलित मुलींचा छळ करतात, जातीवाचक शिव्या देतात, विनयभंग करतात. पण आरोपी आपलेच सहकारी असल्याने पोलिसांकडून अ‍ॅट्रोसिटीची साधी तक्रारही घेतली जात नाही. ही वस्तुस्थिती बदलली पाहिजे.”

त्यांनी पुढे सांगितले की, काल रात्री त्यांनी व रोहित पवार, अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar), प्रशांत जगताप यांच्यासह सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (Ranjankumar Sharma) आणि अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील (Manoj Patil) यांच्याशी चर्चा केली, पण पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला.

पोलिसांवर गंभीर आरोप

सोशल मीडियावर श्वेता एस (Shweta S) नावाच्या तरुणीने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिच्यानुसार, कोथरूड पोलीस ठाण्यातील पीएसआय प्रेमा पाटील (Prema Patil) यांनी मुलींना म्हटले, “तुम्ही महार-मांगाच्या ना, तुमची जात अशीच आहे. तू किती पोरांसोबत झोपलीस? तू रां# आहेस का?”

तसेच छत्रपती संभाजीनगरचे पीएसआय कामटे (Kamte) यांनी मुलींशी असभ्य वर्तन केले, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, असा आरोप आहे. त्यांनी म्हटले, “तुमच्या स्कार्फ सारखे आहेत, मग तुम्ही लेस्बियन आहात का? तुमच्या सारख्या मुलींना आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही, तुमचं करिअर आम्ही बरबाद करू.”

या घटनेमुळे पीडित मुलींचा मानसिक तणाव वाढला आहे. पोलिसांच्या वागण्याचा निषेध करत श्वेता एस यांनी म्हटले –
“या मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला आहे. पोलिसांनी तातडीने माफी मागितली पाहिजे. अन्यथा आम्ही हे प्रकरण लावून धरू.”

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now