‘ …तर मराठा आंदोलन करावं लागेल’; विनायक मेटेंचा ठाकरे सरकारला इशारा

नाशिक। ‘ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले त्यासाठी तत्कालीन मदत करण्याची घोषणा केली. त्याबद्दल हे सरकार काहीच करत नाहीये. जर हे असेच चालत राहिले तर नाईलाजाने आम्हाला मराठा आंदोलन करावे लागेल’, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे म्हणाले की, “मराठा आंदोलनात अनेकांवर केसेस झाल्या त्याबाबत काही निर्णय घेण्यात आलेला नाही. अनेक केसेस तशाच पडून आहेत. ज्यांचं बलिदान दिले त्यासाठी तत्कालीन मदत करण्याची घोषणा केली.

मात्र त्याबद्दल हे सरकार काहीच करत नाही. तर कोपर्डीच्या माझ्या बहिणीला अजून न्याय मिळालेला नाही. मराठा समाजाच्या विरोधात हे सरकार असल्याचे वाटत आहे.

या सरकारमधील मराठे नेते २०१४ च्या आधी चुका करत होते, तेच आता सहा महिन्यांत सुरु झाले आहे. मी बोललो त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे.

त्यांनी लक्षात घेऊन काहीच पाऊले उचलली नाही तर आंदोलन करावं लागेल. कारण मराठा समाजाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय न्याय मिळणार नाही”.

“झोपेचं सोंग घेतलं असेल तर त्यांना जाग करावं लागेल, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा संभ्रम होत आहे. मराठा समाजाकडे अत्यंत दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप विनायक मेटे यांनी सरकारवर केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.