पतीचं ११ हजार बील भरण्यासाठी पत्नीकडे नव्हते पैसे; रुग्णालयाने मंगळसुत्रचं घेतलं ठेवून

बुलढाणा | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नातेवाईक धडपडत आहेत. देशात चिंतेचे वातावरण पसरलं आहे.

कोरोना महामारीमध्ये अनेक रुग्णालयांनी नातेवाईकांकडून पैसे उकळलले आहेत. देशात अशा घटना दिवसेंदिवस घडत आहेत. रुग्णाच्या मृत्यूनंतरही आधी बीलाचे पैसे भरा मग मृतदेह घेऊन जा अशी भूमिका अनेक रुग्णालयांनी घेतली होती.

अशातच बुलढाण्यामध्ये पैशापुढे माणुसकी मेली असल्याची  घटना समोर आली आहे. फक्त ११ हजार रुपयांसाठी एका खाजगी कोविड सेंटरने रुग्णाच्या पत्नीचं मंगळसुत्र ठेवून घेतलं आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मंगेश गवई नावाच्या एका गरीब कुटूंबातील तरूणाला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. यानंतर त्याला एका खाजगी कोविड सेंटरमधील डॉ पंकज मंत्री यांनी छातीचा MRI करायला सांगितला. मात्र यासाठी पैसे जास्त लागणार होते. यामुळे मंगेशने गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला.

गावातील आरोग्य केंद्रात मंगेशने कोविड टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. मात्र तरीही मंगेशने MRI करून घेतली. MRI रिपोर्ट पाहून डॉ. मंत्रीने त्यांच्या खाजगी कोविड सेंटरला भरती होण्यास सांगितले.

कोविड सेंटरमध्ये मंगेशवर रुग्णालयाने ९ दिवस उपचार केले. यानंतर मंगेशला बरं वाटू लागले. रुग्णालयाने डिस्चार्ज देताना बील ८१ हजार झालं असल्याचं सांगितलं. बीलाची रक्कम पाहून मंगेश आणि त्याच्या पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली.

मंगेशच्या पत्नीने इकडून तिकडून ७० हजार रुपये जमा करत रुग्णालयाला दिले. मात्र तरीही ११ हजार रुपये राहिले होते. यानंतर फक्त ११ हजार रुपयांसाठी रुग्णालयाने रुग्णाच्या पत्नीचं मंगळसुत्र मागितलं. पैसे जवळ नसल्याने नाईलाजाने पत्नीने मंगळसुत्र रुग्णालयाला दिलं. यानंतर रुग्णालयाने त्यांना घरी जाऊ दिलं.

सोशल मिडियावर  या संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी रुग्णालयावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर आता प्रशासन काय कारवाई करतय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
तौक्तेनंतर आता चक्रीवादळ ‘यास’चा मोठा धोका, भारतीय हवामान विभागाने दिला हा इशारा
….म्हणून सुशील कुमारने हत्येदरम्यान स्वत:चा व्हिडीओ रेकॉर्ड केला, पोलिसांची धक्कादायक माहिती
पैलवान सुशिल कुमारने ‘अशी’ केली सागर धनखडची हत्या; धक्कादायक कारणही आले समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.