Share

Ramdas Kadam: स्टोव्हचा स्फोट झाला अन् माझी पत्नी भाजली, या हातांनी तिला उचललं; रामदास कदमांचं परबांना उत्तर

Ramdas Kadam:  खेड (Khed) तालुक्यातील एका जुन्या घटनेवरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटला आहे. 1993 मध्ये झालेल्या आगीत भाजलेल्या ज्योती कदम (Jyoti Kadam) यांच्या प्रकरणावर अनिल परब (Anil Parab) यांनी केलेल्या आरोपांवर रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, “माझ्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले नव्हते, तर घरातील स्टोव्हचा भडका उडाल्याने ती भाजली होती. त्या क्षणी मीच तिला वाचवलं आणि माझेही दोन्ही हात त्या आगीत जखमी झाले.”

रामदास कदम म्हणाले की, 1993 साली आमच्या खेड येथील घरी दोन स्टोव्ह होते. माझी पत्नी स्वयंपाक करत असताना तिच्या साडीचा पदर स्टोव्हमध्ये गेला, त्यामुळे आग लागली आणि स्फोट झाला. मी तत्काळ तिच्या मदतीला धावलो. तिला वाचवताना माझे दोन्ही हात भाजले. त्यानंतर सहा महिने ती मुंबईच्या जसलोक रुग्णालयात (Jaslok Hospital Mumbai) उपचार घेत होती. मीदेखील त्या काळात तिच्या सोबत होतो. आजही आम्ही नवरा-बायको एकत्र सुखाने संसार करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

त्याच वेळी अनिल परब यांनी केलेल्या नार्को टेस्टच्या मागणीवरही कदम यांनी प्रत्युत्तर दिलं. “त्यांना जर माझी नार्को टेस्ट करायची असेल, तर मी तयार आहे. पण खोटे आरोप करून माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी केली, त्यामुळे मी त्यांच्यावर न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला.

याच पत्रकार परिषदेत त्यांनी परब यांच्यावर गंभीर आरोप केले. कदम म्हणाले की, “अनिल परब हे सुशिक्षित वकील असूनही त्यांनी चंद्रग्रहणाच्या रात्री वरळी कोळीवाड्यात (Worli Koliwada) मध्यरात्री बकऱ्याचा बळी दिल्याची चर्चा आहे. त्यांच्या गाडीत बकरा होता, आणि त्यांच्यासोबत दोन तांत्रिकही होते. त्यांनी माझं आणि माझ्या मुलगा योगेश कदम यांचं नाव घेऊन ते अघोरी कृत्य केलं, असं स्थानिकांनी सांगितलं.” मात्र, त्यांनी स्पष्ट केलं की, “ही माहिती मला स्थानिकांकडून समजली, पण याबाबत माझ्याकडे खात्रीशीर पुरावा नाही.”

दरम्यान, अनिल परब यांनी या प्रकरणावर यापूर्वी केलेल्या विधानात म्हटलं होतं की, “रामदास कदम यांच्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले की त्यांना कोणी जाळलं, हे स्पष्ट व्हायला हवं. त्यासाठी त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. तसेच त्यांच्या मुलगा योगेश कदम (Yogesh Kadam) हे गृहराज्यमंत्री असल्याने त्यांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायाची चौकशी करावी,” असं त्यांनी म्हटलं होतं. राजकारणातील जुनी स्पर्धा पुन्हा एकदा पेटल्यामुळे कोकणात (Konkan) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now