पुणे | राज्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घेतले आहेत. कोरोनामुळे सर्व काही बंद असल्याने गाव-खेड्यातील मंदिरांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
त्यामुळे राज्य सरकारने मंदिरातील प्रत्येक सेवेकऱ्याला महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये वेतन द्यावे. एक एप्रिलपासून ते केंद्राची कोरोना अधिसूचना मागे घेण्यापर्यंत हे वेतन देण्यात यावे.
तसेच मंदिराच्या देखभालीसाठी एक रकमी तीन लाख रुपये देण्यात यावे. राज्यातील संपन्न मंदिरांकडून निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाने केली आहे.
सरकारने गाव खेड्यातील ३० लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न नसलेल्या मंदिरांची यादी तयार करावी. या मंदिरांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करावे.
सरकारला या संदर्भात काही कायदेशीर अडचणी असतील, तर राज्यातील आर्थिक संपन्न मंदिर आणि संस्थांकडून निधी उपलब्ध करून घ्यावा, असे हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवले आहे.