माधूरी, ऐश्वर्या यांच्या नृत्यामागील खरा चेहरा म्हणजे सरोज खान

 

 

संगीत आहे म्हटल्यावर तिथे नृत्य देखील येतेच. बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट त्यांच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

या गाण्यांवर अभिनेते आणि अभिनेत्री नृत्य करतात. पण या नृत्याचे दिग्दर्शक खुप कमी लोकांना माहीत आहेत. पण सरोज खान हे नाव सर्वांना माहिती आहे.

कारण बॉलीवूडमध्ये नृत्यदिग्दर्शकाला पडद्याच्या मागून पडद्यासमोर आणण्याचे काम सरोज खान यांनी केले आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शकांना एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे.

माधूरी दिक्षीत, श्रीदेवी, एश्वर्या राय अशा अभिनेत्रींच्या डान्सबद्दल बोलले जाते. तेव्हा नकळत सरोज खान यांचा चेहरा समोर येतो. कारण त्यांनीच या सर्व अभिनेत्रींना नृत्यामध्ये आणि त्यातील हावभावामध्ये माहीर बनवले आहे.

सरोज खान बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या नृत्यदिग्दर्शिका आहेत. त्यांनी त्यांच्या नृत्य दिग्दर्शनाने बॉलीवूडच्या अनेक गाण्यांना जिवंत केले आहे.

सरोज खान यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ ला झाला होता. त्यांचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधू सिंह नागपाल होते. सरोज खान यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता. पण फाळणीनंतर त्यांचे संपूर्ण कुटूंब भारतात आले होते.

सरोज खान यांच्या परीवारामध्ये आर्थिक अडचणी होत्या. त्यामूळे त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी ‘नजराना’ या चित्रपटापासून बॉलीवूडमधल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती.

यानंतर आहोश, कितना बदल गया इंसान आणि हावडा ब्रिज यांसारख्या चित्रपटांमध्ये बॅक डान्सर म्हणून काम केले. त्यांनतर त्यांनी चित्रपट ‘दिल ही तो है’ यामध्ये त्यांनी पहील्यांदा नृत्य दिग्दर्शन केले.

वयाच्या १३ व्या वर्षी सरोज खान यांचे लग्न झाले होते. त्यांनी डान्स मास्टर सोहनलाल यांच्याशी लग्न केले होते. सोहनलाल यांचे हे दुसरे लग्न होते. पण त्यांच्या पहील्या लग्नाबद्दल सरोज खान यांना काही माहीती नव्हती.

सरोज खान यांना राजू मुलगा झाला. पण या मुलाला सोहनलालने यांनी आपले नाव देण्यास नकार दिला. यामूळे हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर सरोज खानने सरदार रोशनसोबत लग्न केले.

सरोज खान यांनी गीता मेरा नाम, दोस्त, मौसम, प्रेम योगी यांसारख्या चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शन केले. पण त्यांना खरी ओळख ‘हिरो’ या चित्रपटापासून मिळाली. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

यानंतर सरोज खानने मागे वळून पाहीले नाही. ‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दो तीन’ या गाण्यासाठी त्यांना पहील्यांदा फिल्मफेअर आवॉर्ड मिळाले.

सरोज खान यांनी बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी डान्स शिकवला. साधना, वैजैंतीमाला, हेलन, शर्मिला, माला सिन्हा, रेखा यांच्यासोबतच, माधूरी, श्रीदेवी, एश्वर्या राय, जुही चावला, एवढेच नाहीतर त्यांनी सना लिओनीला देखील डान्स शिकवला आहे.

‘देवदास’ या चित्रपटातील त्यांच्या नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तीन वेळेस त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर ८ फिल्मफेअर आवॉर्ड मिळाले आहेत.

सरोज खान यांनी बॉलीवूडचे अनेक गाणे अजरामर केले आहेत. बदलत्या वेळेसोबत त्यांनी त्यांच्या नृत्यामध्ये बदल केले.

त्यांनी सनी लिओनीच्या गाण्याचे देखील नृत्य दिग्दर्शन केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत २००० पेक्षा अधिक गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

सरोज खान यांच्या मृत्यूमुळे बॉलीवूडाला आणखी एक धक्का बसला आहे. सरोज खान यांच्या मृत्यूमुळे चित्रपटांमधला एक सुवर्ण काळ संपला आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.