तिजोरीत खडखडाट असताना मंत्र्यासाठी “इनोव्हा क्रिस्टा’ गाडी खरेदीचा घाट

मुंबई । लॉकडाऊनमुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. दरम्यान, राज्यातील शालेय शिक्षणमंत्र्यांसाठी नवी कोरी ‘इनोव्हा क्रिस्टा’ ही गाडी खरेदी करण्यात येणार आहे.

शासनाने गाडी खरेदीसाठी तब्बल 22 लाख 83 हजार रुपये खर्चास मान्यताही दिली आहे. हा शासनाचा अजब कारभारच म्हणावा लागणार आहे.

कोरोनामुळे शासनाची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. विविध विभागातील नवीन पदभरतीला बंदी घालण्यात आली आहे.

या पार्श्‍वभूमीवर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीबाबतच्या घोषणा केल्या जात आहे. यामुळे आता वेतन देण्यासाठी कर्ज काढण्याची परिस्थिती येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

7 नोव्हेंबर 2012 च्या शासन निर्णयान्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पाच पदांना पाच वाहने खरेदी करण्यास वाहन आढावा समितीने मान्यता दिलेली आहे. कोरोनामुळे राज्य शासनाने शाळा, महाविद्यालयांचे अनुदानही प्रलंबित ठेवले आहे.

वेळेत वेतन मिळत नाही म्हणून शिक्षक, कर्मचारी चिंतेत आहेत. अशावेळी नवीन मंत्र्यांना नवीन वाहने खरेदी करण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी थांबवणे आवश्‍यक आहे. या निर्णयामुळे सरकारवर टीका होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.