सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अनेकांची नावं समोर आली; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खुलासा

 

मुंबई। अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु आहे. दरम्यान सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी अनेकांची नावं समोर आली आहेत, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका मुलाखतीत राज्यातील प्रश्नांसोबतच सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरही महत्त्वाची माहिती दिली. “या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे.

गेल्या ८ दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी चौकशी करतायत. आमच्याकडे व्यावसायिक दुष्मनीतून त्यानं आत्महत्या केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या पद्धतीनं पोलीस तपास करतायत”, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

“मी नावं इथं आपल्याला सांगणार नाही, पण अनेक नावं समोर आली आहेत. ज्यांचा तपास करणं अतिशय गरजेचं आहे. या प्रकरणात ज्यांची नावं समोर आली आहेत त्यांना बोलावलं जाईल आणि त्यांची चौकशी होईल.

तपास पूर्ण होईपर्यंत काहीही सांगणं योग्य नाही. या सगळ्या गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात”, असे देखील अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

सुशांतने त्याच्या वांद्र्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर सोशल मिडीयावर त्याच्या चाहत्यांनी स्टार किड्स तसेच अनेक दिग्दर्शकांना जबाबदार ठरवले.

शिवाय या प्रकरणाचा सीबीआयद्वारे तपास करण्याची मागणीही करण्यात येते आहे. या प्रकरणी आतापर्यंत जवळपास २८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.