Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)तर्फे आज (शनिवार, २ मे) राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे कारण या सत्कारात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं असून, ते एकाच मंचावर येणार का याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
विशेष बाब म्हणजे, या सत्कार यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचं नाव सर्वप्रथम आहे. 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. मात्र, 2023 मध्ये पक्षात मोठी फूट पडली आणि अजित पवार यांनी मोठ्या संख्येने आमदारांच्या समर्थनाने पक्षावर दावा ठोकला. आता त्याच गटाकडून आयोजित कार्यक्रमात शरद पवार उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच, उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. परंतु महायुतीशी हातमिळवणी केलेल्या अजित पवारांच्या गटाकडून आलेल्या निमंत्रणाला ते स्वीकारणार का, याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे हेही माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या सत्काराचाही समावेश आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विभाजनानंतर पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदे एकाच मंचावर दिसतील का, हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतो आहे.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांचं एकत्र उपस्थित राहणं काही नवीन राहिलेलं नाही. साताऱ्यातील एका बैठकीत त्यांनी एकमेकांशी संवाद साधल्याचे दृश्य सोशल मीडियावर चर्चेत आलं होतं. मात्र, याउलट उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अजूनही थेट संवाद झाल्याचं दिसून आलेलं नाही. नुकत्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनातही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हस्तांदोलन झालं, पण शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्याकडे न पाहताच पुढे गेल्याचं दृश्य अनेकांनी पाहिलं.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर हे सर्व नेते एकत्र येतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कार्यक्रमाचा राजकीय अर्थ लावण्याचे प्रयत्नही सुरू झाले असून, पुढील घडामोडी या कार्यक्रमावर मोठा प्रभाव टाकू शकतात.
the-name-of-ncp-founder-sharad-pawar-was-mentioned-first