बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अखेर अटक

 

मुंबई। काही दिवसांपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दरम्यान आज यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

विशाल मोरे उर्फ विठ्ठल काण्या (वय २०) असे या मुख्य आरोपीचे नाव असून तो कल्याणचा रहिवासी आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी राजगृह या निवासस्थानी केलेल्या तोडफोड प्रकरणी माटुंगा पोलिसांनी उमेश सीताराम जाधव (वय ३५) या आरोपीला अटक केली होती. तो दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करत होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानंतर आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतील दादर हिंदू कॉलनी येथील राजगृह निवासस्थान पुस्तकांसाठी बांधले होते.

त्यामुळे या घराला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. जगभरातील त्यांचे अनेक अनुयायी या ठिकाणी येत असतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी या राजगृहाची आरोपींनी तोडफोड करून घरांच्या खिडक्यांवर देखील दगडफेक केली होती.

याशिवाय घराच्या परिसरातील कुंड्या देखील तोडण्यात आल्या होत्या. सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडण्यात आले होते. दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता, ते फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.