कोरोनात वडील वारल्यामुळे चहा विकणाऱ्या त्या लहाणग्याला शिक्षणासाठी मदत करणारा खाकीतला देव..

 

मुंबई। सध्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या महामारीने अनेकांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. क्षणात भरलेलं हसत खेळत असलेलं घर कोलमडून पडतं.

असाच हृदयाला भिडणारा एक प्रसंग वरळी पोलिस ठाण्याच्या ओंकार इराण्णा व्हनमारे यांच्या सोबत घडला. एका फेसबूक पोस्टद्वारे हा प्रसंग व्हनमारे यांनी सांगितला आहे. व्हनमारे मूळचे पंढरपुरचे रहिवासी आहेत.

“आज माटुंगा (दादर) येथे बंदोबस्त करत असताना एक १४ वर्षाचा मुलगा आला आणि विचारलं ,”साहेब चहा घेणार का ?” कोरोना सारख्या महामारीचा विचार करून आधी वाटल हा कोण ? कसा आहे चहा ? कसा बनवला असेल ? म्हणून त्याला नाही सांगितले.

… पण नंतर समजले नाही मनात काय विचार आला, त्याला बोलवून घेतले सहज विचारलं, “बाळा नाव काय तुझं?” ‘सागर माने’ असं नाव सांगून त्याने नकळत अंगावर असलेल्या वर्दीकडे बघितले. त्याला विचारले, “बाळा चहा का विकतोस?”

तर त्याने सांगितले “२९ मार्च ला वडील वारले, त्यांचं चहाचं कॅन्टीन होतं, आतापर्यंत जितकं कमवल होत तितकं सगळ संपलं, घरात आई आणि मी, आई आजारी असते त्यामुळे मीच चहा बनवून विकतो. आणि रोज २०० रुपये मिळवतो.

कारण आता शाळा चालू झाल्या तर वह्या पुस्तक घ्यायला पैसे नाहीत, घर भाडं द्यायचं आहे. “अस बोलून तो गप्प बसला. त्याला विचारलं, “तुला पुढे शिकायचं आहे का?” तर पटकन बोलला, “तुमच्या सारखं पोलिस व्हायचं आहे.”

त्या वेळेस कोणत्या ही प्रकारचा विचार न करता आई वडिलांनी ज्या प्रकारे संस्कार केलेले त्या प्रकारे त्याला १० वीची पुस्तके व वह्या घेऊन दिल्या. तसेच त्याला नंबर देऊन सांगितलं अभ्यासासाठी कोणतीही अडचण आल्यास संपर्क कर, इतके बोलुन त्याच्या कडचा चहा घेतला.

कारण त्याची जिद्द आणि स्वप्न या दोन गोष्टी माझ्यासाठी कोरोना पेक्षाही जास्त महत्वाच्या होत्या. इतके बोलुन त्याला धन्यवाद केले व पुढील येणाऱ्या भावी काळासाठी त्याला शुभेच्छा दिल्या”.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.