Pravin Gaikwad: राज्यातील सोलापूर (Solapur) जिल्ह्यात अक्कलकोट (Akkalkot) येथे संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर १३ जुलै रोजी हल्ला झाल्यानंतर मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. या हल्ल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असून, काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन जखमी कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा संपूर्ण थरारक प्रसंग सांगितला.
रविवारी १३ जुलै रोजी दुपारी सुमारे १ वाजता अक्कलकोटमधील कमलाराजे चौकात प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी शिवधर्म संघटना (Shivdharma) या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आक्रमक झाले. गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासून, शाईफेक करत धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली.
हल्ला होत असताना संभाजी ब्रिगेड चे शहराध्यक्ष शिरीष जगदाळे (Shirish Jagdale) आणि जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले (Sambhaji Bhosale) यांनी गायकवाड यांना वाचवण्यासाठी मोठ्या हिंमतीने मध्यस्थी केली. त्यांनी दीपक काटे (Deepak Kate) आणि त्याच्या साथीदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने प्रवीण गायकवाड यांना सोडून शिरीष जगदाळे व संभाजी भोसले यांच्यावर हल्ला चढवला. संभाजी भोसले यांना जमिनीवर पाडून तुडवण्यात आले, तर शिरीष जगदाळे यांना जबरदस्त मारहाण करत गंभीर जखमी करण्यात आले.
या घटनेनंतर संतप्त कार्यकर्ते व पदाधिकारी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूर भेटीत मिळाले. यावेळी हल्ल्यातील जखमी कार्यकर्त्यांनी स्वतःचा अनुभव सांगत सांगितले की, “आम्ही आडवे आलो नसतो तर प्रवीण गायकवाड यांचा जीव गेला असता.” दीपक काटे व त्याच्या साथीदारांवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या घटनेचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (NCP-Sharad Pawar) च्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) व अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला आहे. अजित पवार गटाचे नेतेही यामध्ये उतरले आहेत. अनेक भागात निषेध आंदोलन होत असून संभाजी ब्रिगेड अधिक आक्रमक झाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात दीपक काटे आणि भुनेश्वर शिरगुरे (Bhuneshwar Shirgure) यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींवर तपास सुरू आहे. हल्ल्याप्रकरणी भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि दीपक काटे यांच्यात संभाषण झाल्याचाही दावा संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे. हा हल्ला राज्यातील सामाजिक सलोखा आणि राजकीय वातावरणाला हादरवणारा ठरला आहे.