झोपेत घोरण्याची सवय आहे धोकादायक, ‘या’ आजारांना देताय तुम्ही निमंत्रण

अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. आपण झोपेत घोरतोय हे अनेकांना माहीतच नसते. पण याच घोरण्याने अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. घोरण्याने निद्राश्वसनरोध या रोगाचा धोका बळावतो. आपण या घोरण्याला हसण्यावारी घेतो पण यामुळे शरीराला खूप धोका आहे.

दीर्घकाळ झोपणाऱ्या व्यक्ती अनेकदा घोरत असतात. आपण त्यांना सहज म्हणतो काय कुंभकर्णसारखा झोपतो. त्या व्यक्ती कमी झोपेतही घोरत असतात. मात्र याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे निर्माण होणारे आजार हे आयुष्यभरसुद्धा राहू शकतात. त्यामुळे उच्चरक्तदाब, हृदयविकार, श्वसनरोग, पक्षाघात असे अनेक रोग होऊ शकतात.

अनेकदा अशा व्यक्तींना श्वास रोखला जाण्याची जाणीव होते. त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरवठा कमी होतो. हृदयावर त्याचा परिणाम होतो. अनेकदा वजन जास्त असणाऱ्या लोकांना घोरण्याची सवय असते हे आपण पाहिले आहे. घोरण्यामुळे अनेकदा दिवसा दम लागणे, झोप पूर्ण होऊनही ती पूर्ण झाल्यासारखे न वाटणे, रक्तदाब वाढणे अशा अनेक समस्या येतात.

यामध्ये अनेक लक्षणे आढळतात. यात घोरण्यामुळे श्वास रोखला जातो. दचकून जाग येते, पुन्हा वेगात श्वास सुरू होतो. यामुळे श्वसनमार्गावर ताण येतो. झोपेतून उठल्यानंतर चिडचिड, अस्वस्थता, डोकेदुखी, सुरू होणे. एकाग्रता कमी होणे, सतत लक्ष विचलित होणे. मूडमध्ये बदल होत राहणे.

झोपेत वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे. लहान मुलांना मात्र वेगळी लक्षणे दिसतात जसे की, बिछाना ओला करणे, झोपेत खूप घाम येणे, सतत वाईट स्वप्न येणे. त्यामुळे वेळीच सावध होऊन निद्रातज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. हा विकार होण्यास प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

अनियंत्रित वजन वाढणे. आनुवंशिक घोरण्याची सवय असणे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त असते. पुरुषांमध्ये १७ इंचहून अधिक तर स्त्रियांमध्ये १६ इंचाहून अधिक लठ्ठ असणारी मान आणि अतिधूम्रपान केल्याने हा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. यावर तुम्हाला उपचार आहे. जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्हाला वजन कमी करावे लागेल तसेच मौखिक उपकरणातून उपचार करता येतो. बऱ्याच कंठाच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.