“संघाच्या आदेशाने चालणारे केंद्रातील भाजप सरकार हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे”

मुंबई । काँग्रेस पक्षाने या देशात लोकशाही रूजवली. मात्र केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे, असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी १९४२ च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळ आली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निर्णायक लढा असणाऱ्या ऑगस्ट क्रांती लढ्याला ७८ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने थोरात यांनी ऑगस्ट क्रांती मैदानातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले.

थोरात म्हणाले की १९४२ रोजी आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी मुंबईच्या ऐतिहासीक ऑगस्ट क्रांती मैदानातून ‘अंग्रेजो चले जावो, चा नारा दिला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जात, धर्म विसरून लाखो लोक या लढ्यात सहभागी झाले.

यामुळे देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारांनी या देशात लोकशाही रूजवली व वाढवली.

ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १९४२ च्या लढ्याला विरोध केला. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारे केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशातील लोकशाही मोडीत काढून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे.

सत्ता आणि पैशाचा वापर करून विरोधी पक्षांची लोकनियुक्त सरकारे पाडली जात आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर पक्षांना संपवण्यासाठी केला जात आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.